
कर्नाटकमध्ये जानेवारी महिन्यात उफळलेल्या हिजाबवादामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. यामुळे दोन गट तयार झाले होते, एक हिजाबचे समर्थन करत होता, तर दुसरा त्याला विरोध करत होता. कर्नाटकातील शाळांमध्येही हिंदू-मुस्लिम विद्यार्थी आमनेसामने आले होते. यावेळी मुस्कान नावाच्या एका मुस्लिम विद्यार्थीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
हिजाबबंदीच्या मागणीसाठी हिंदू विद्यार्थी शाळेत भगवा गमचा घालून आले होते आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. यावेळी एकट्या मुस्कान हिने विद्यार्थ्यांसमोर उभे राहून ‘अल्लाहू अकबर’ची घोषणा दिली होती. याचे दहशतवादी संघटना अल कायदाने कौतुक केले होते. अलकायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरी (Ayman al-Zawahiri) याने मुस्कानला ‘हिंदुस्थानची थोर स्त्री’ म्हटले होते. यावर आता हिजाब गर्ल मुस्कानच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुस्कानचे वडील मोहम्मद हुसेन खान यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, आमच्या कुटुंबाला जागतिक दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाकडून कोणतीही प्रशंसा नकोय. तसेच आम्हाला व्हिडीओ बद्दलही माहिती नाही, तो (अयमान अल जवाहिरी) नक्की कोण आहे हे देखील आम्हाला माहिती नाही. आम्ही आज पहिल्यांदा त्याला पाहिले. तो अरबी भाषेमध्ये काहीतरी बोलत होता.
अल कायदासारख्या दहशतवादी संघटनेने मुस्कानला पाठिंबा दिल्यानंतर काहींनी हिजाब प्रचारकांच्या पाठीमागे दहशतवादी संघटनांची शक्ती असल्याची शक्यता वर्तवली होती. यावर बोलताना मुस्कानचे वडील म्हणाले की, हिंदुस्थानमध्ये आपण सर्व भावांप्रमाणे प्रेम आणि विश्वासाने राहतो. तसेच जवाहिरी याचा उद्देष विष पेरण्याचा असून हिंदुस्थानी नागरिकांमध्ये फूट पाडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आहे, असेही ते म्हणाले.
हिजाबवादामुळे आमच्या कुटुंबातील शांतता भंग झाली आहे. त्यामुळे हिंजाबची परवानगी असणाऱ्या महाविद्यालयामध्ये मुस्कानच्या प्रवेशाची तयारी सुरू असल्याचे ते म्हणाले, असेही मुस्कानचे वडील म्हणाले.
दरम्यान, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये उसळलेल्या वादावेळी मुस्कानने दाखववेल्या धैर्याचे मुस्लिम संघटनांनी कौतुक केले होते. अनेक मुस्लिम संस्थांनी मुस्कानचा सत्कार करत तिला रोख रक्कमही दिली होती. ही रक्कम आपण सरकारी रुग्णालयाला रुग्णवाहिकी घेण्यासाठी दान दिल्याचे मुस्कानच्या वडिलांनी सांगितले.
























































