कर्नाटकात विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; 8 जखमी, 21 जणांना अटक

देशात गणेशोत्सव धामधुमीत आणि आनंदात साजरा केल्याचे पहायला मिळाले. एकीकडे पाण्यात बुडून काही जणांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे वादविवाद पहायला मिळाले. कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील महूर येथे रविवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये ८ जण जखमी झाले असून, २१ जणांना अटक करण्यात आली. रामरहीमनगरमधील मशिदीसमोरून मिरवणूक जात असताना दगडफेक झाली. यानंतर दुसऱ्या बाजूनेही दगडफेक केल्यानंतर दोन्ही समुदायांमध्ये हाणामारी झाल्याचे पहायला मिळाला.

मिरवणुकीत झालेल्या घटनेवेळी पोलीस उपस्थित होते. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी मंड्या येथे या घटनेवरून हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत जाळपोळही केली. राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, परिसरात शांतता राखण्यासाठी बी एनएसचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. काही लोकांना अटकही करण्यात आली आहे. यापूर्वी २४ ऑगस्ट २०२४ रोजीही मंड्या येथे हिंसाचार झाला. नागमंगला येथील गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. म्हैसूर रोडवरील दग्र्यासमोर पोहोचताच काही लोकांनी दगडफेक केली होती.