करवा चौथसाठी विशेष ट्रेनचं आयोजन, पण चारच तिकिटे खपली आणि….

561

उत्तर हिंदुस्थानात कोजागिरी पौर्णिमेनंतर सुवासिनींना वेध लागतात ते करवा चौथचे. त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात वेगवेगळ्या प्रकारचे बेत या दिवसासाठी आखले जातात. या दिवसासाठी खास म्हणून पाच दिवसांचं राजस्थान पर्यटनाचं पॅकेज असलेली ट्रेनमध्ये फक्त चारच तिकिटे खपली आहेत.

त्याचं झालं असं की, रेल्वेने करवा चौथचं निमित्त साधून द मॅजेस्टिक राजस्थान डिलक्स या विशेष पर्यटन पॅकेजचं आयोजन केलं होतं. एकाच ट्रेनमधून प्रवास करत ही ट्रेन सफदरजंग स्टेशन ते जैसलमेर किल्ला, पटवन हवेली, गडीसर सरोवर, मेहरानगढ किल्ला, आमेर किल्ला आणि सिटी पॅलेस अशा राजस्थानच्या ऐतिहासिक पर्यटनस्थळांची सफर घडवून आणणार होती. यासाठी करवा चौथ या थीमखाली फक्त विवाहित जोडप्यांसाठी ही ट्रेन धावणार होती. त्यात वेगळ्या छोट्या खोल्या, पायांचे मसाज इत्यादी विशेष सुविधाही देण्यात आल्या होत्या.

पण, खरी गोम झाली ती या पॅकेजच्या तिकिटांमध्ये. या ट्रेनचं तिकिट एसी फर्स्ट क्लाससाठी प्रति जोडी 1 लाख 2 हजार 960 इतकं होतं, तर एसी दोन टिअरसाठी 90 हजार रुपये इतकं होतं. टूरचं आयोजन झाल्यानंतर फक्त दोनच जोडप्यांनी तिकिटं खरेदी केली होती. विशेष ट्रेनमध्ये फक्त चारच तिकिटे विकली गेल्यामुळे रेल्वेला अखेर ही योजना गुंडाळत ट्रेन रद्द करावी लागली.

आपली प्रतिक्रिया द्या