
>> कौशल इनामदार
सुप्रसिद्ध संगीतकार मा. गुलाम हैदर एका लहानग्या मुलीच्या आवाजाचं ध्वनिमुद्रण घेऊन सिनेनिर्माता शशधर मुखर्जी यांना भेटले. फिल्मिस्तानचे मालक असलेले मुखर्जी तेव्हा ‘शहीद’ नावाच्या नव्या चित्रपटाची निर्मिती करत होते. त्या चित्रपटाला संगीत स्वतः हैदर देत होते आणि या चित्रपटात एका नव्या गायिकेला संधी द्यावी या हेतूने हैदर यांनी या लहान मुलीचं गाणं ऐकवलं. त्या गायिकेचा आवाज शशधर मुखर्जींनी ऐकून घेतला, पण त्या गायिकेला चित्रपटात गाण्याची संधी मात्र नाकारली.
‘‘या गायिकेचा आवाज फारच पातळ आहे. हा असला नाजूक आवाज आपल्या व्यवसायात चालणार नाही,’’ असं सांगून त्यांनी गुलाम हैदरना परत पाठवलं.
कुणी तेव्हा शशधर मुखर्जींना सांगितलं असतं की, या नाजूक, बारीक आवाजात पुढची सत्तर वर्षं याच व्यवसायात केवळ टिकून राहण्याचंच नव्हे तर या व्यवसायावर राज्य करण्याचं बळ आहे तर कदाचित मुखर्जी हसले असते. पण झालं असंच! कारण त्या लहान मुलीला अमरत्व देणारा हाच आवाज ठरणार होता. ‘शहीद’ चित्रपटातल्या सात गाण्यांपैकी एकही गाणं न गाणाऱया लता मंगेशकरांनी पुढे याच सिनेसृष्टीत चाळीस हजारांहून अधिक गाणी गाऊन रसिकांना मोहीत ठेवलं.
पण हे यश सहज आलं नाही. सुरुवातीच्या काळात पदोपदी परीक्षा, अपमान यांचा सामना लताबाईंना करावा लागला. याच सुरुवातीच्या काळात एकदा लताबाई, संगीतकार अनिल बिस्वास आणि अभिनेते दिलीप कुमार लोकल ट्रेनने गोरेगावला चालले होते. अनिल बिस्वासांनी लताबाईंची ओळख दिलीप कुमारांशी करून दिली आणि म्हणाले, ‘‘ही मुलगी माझ्या आगामी चित्रपटाची गाणी गाणार आहे. फार छान गाते.’’
दिलीप कुमारांनी लताबाईंची कोण, कुठली चौकशी केली तेव्हा अनिल बिस्वास म्हणाले की, मुलगी मराठी आहे. त्यावर दिलीप कुमार म्हणाले, ‘‘मराठी? ही उर्दू–हिंदी गाणी कशी गाणार? मराठी भाषकांच्या उर्दू उच्चारांना वरण-भाताचा वास असतो.’’
लताबाईंनी त्यांचे टीकेचे बोल ऐकून घेतले; परंतु त्यांना ते अजिबात रुचले नाहीत. त्याच दिवशी त्यांनी नौशादसाहेबांचे सहाय्यक शफी यांना सांगून उर्दू भाषेची शिकवणी लावून घेतली. केवळ उर्दू बोलायलाच नव्हे, तर काही प्रमाणात लिहायलाही शिकल्या.
या दोन प्रसंगांवरून एक बोध होतो तो म्हणजे, सामान्यांपासून प्रतिभावंतांपर्यंत नकार, अपमान हे सर्वच कलाकारांना पचवावे लागतात. लता मंगेशकरांवर लिहिल्या जाणाऱया अनेक लेखांमधून त्यांच्या अलौकिक प्रतिभेचं गुणगान होतं, परंतु त्यांच्या कारकिर्दीवर नजर टाकली की या अचाट प्रतिभेच्या मागची त्यांची प्रचंड मेहनत, चिकाटी, अपमान पचवायची शक्ती आणि त्यावर विजय मिळवण्याची चिवट इच्छाशक्ती आपल्याला दिसते. प्रतिभा ही बऱयाच अंशी परमेश्वरी कृपा असली तरी बाकीच्या या गोष्टी परिस्थितीतून आणि अनुभवातून शिकून कमवाव्या लागतात.
प्रतिभा ही दुधारी तलवार असते. आपल्या प्रतिभेच्या आधारे रसिकांची हृदयं जिंकण्याआधी या प्रतिभेवर विजय मिळवावा लागतो. आत्मविश्वास, सकारात्मक मनोवृत्ती, शिस्त, चिकाटी, मेहनत, व्यासंग वाढवण्याची क्षमता नसेल तर जी प्रतिभा वर म्हणून मिळाली असते ती शाप भासू शकते.
ही शिस्त अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टीत दिसून येते. मागे एकदा लताबाईंनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं गाण्याचं नोटेशन पाहण्याची संधी मला मिळाली. संगीतकाराकडून गाणं शिकताना त्यांनी गाणं लिहून घेतलं होतं. अतिशय स्वच्छ अक्षरात, व्यवस्थित गाणं लिहून घेतल्यावर त्यांनी संगीतकाराकडून चाल शिकता शिकता केलेल्या बारीकसारीक नोंदीही त्यावर केलेल्या होत्या. कुठे मींड घ्यायची, कुठे मुरकी आहे, श्वास घ्यायला नेमकी जागा कुठे आहे असं सगळं त्या कागदावर होतं. मला त्यांच्याकडून गाऊन घेण्याचं भाग्य कधी लाभलं नाही; परंतु मी अनेकांकडून ऐकलं आहे की, त्या गाणं गायल्यावर संगीतकाराला विचारायच्या की गाणं त्यांच्या पसंतीस उतरलं आहे का, परंतु गाऊन झाल्यावर त्या स्वतःचं गाणं अजिबात ऐकायच्या नाहीत. त्याचं कारण त्यांनीच एकदा असं सांगितलं होतं की, त्यांना त्यांनी गायलेल्या गाण्यात सतत सुधारायची शक्यता दिसतच राहायची. याचाच अर्थ असा की, त्यांच्यासाठी ‘पर्फेक्शन’ची व्याख्या ही आपल्या व्याख्येपेक्षाही अधिक ‘परफेक्ट’ होती. असं असूनही संगीतकाराला जोवर ते गाणं त्याच्या मनाजोगतं झालंय असं वाटत नाही तोवर त्या गात राहायच्या.
श्रीनिवास खळे यांनी मला सांगितलेली एक गोष्ट. लताबाई त्यांचं एक गाणं गायल्या. ते गाणं लता मंगेशकरांच्या दृष्टीने चांगलं झालं होतं आणि त्या डबिंग रूममधून बाहेर आल्या. खळेसाहेब पण ‘टेक ओके’ म्हणाले; पण त्यांच्या डोळ्यात थोडी साशंकता होती. लताबाई म्हणाल्या की, जोवर तुमच्या दृष्टीने गाणं परिपूर्ण होत नाही तोवर मी ते गात राहीन असं म्हणून त्यांनी संपूर्ण गाणं पुन्हा ध्वनिमुद्रित केलं!
लताबाईंनी त्यांच्या मुलाखतींमधून सांगितलेली दोन वाक्यं माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहेत. त्यांना जेव्हा विचारलं की, त्यांनी गाणं केलं नसतं तर काय केलं असतं? तेव्हा त्या उत्तरल्या – ‘‘काय केलं असतं ते माहीत नाही, पण मी कुठल्याही क्षेत्रात गेले असते तरी मी लता मंगेशकरच झाले असते.’’
आणि दुसरं वाक्य – जेव्हा त्यांना विचारलं की, पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हायला आवडेल तेव्हा त्या म्हणाल्या – ‘‘मी कुणीही झाले तरी पुन्हा लता मंगेशकरचा जन्म नको. कारण लता मंगेशकरचं दुःख केवळ लता मंगेशकर जाणते.’’
या दोन वाक्यांमध्ये लता मंगेशकर यांचं संपूर्ण जीवनचरित्र आहे. एक मात्र नक्की. आपल्यासारखे रसिक पुनःपुन्हा जन्म घेत राहिले तरी लता मंगेशकरांचा आवाज तेव्हाही आपण ऐकत राहू आणि त्यातच गतजन्मीची ओळख शोधू!
(लेखक प्रसिद्ध संगीतकार आहेत)

























































