कयाधुच्या समग्याकडे जाणाऱ्या पुलाची शिवसैनिकांनी केली स्वखर्चातुन दुरुस्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली तालुक्यातील समगाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कयाधु नदीवरील पुल पुर्णत: तुटल्यामुळे हिंगोली व औंढा नागनाथ या दोन तालुक्यामधील १२ गावांचा संपर्क पूर्णपणे बंद झाला होता. प्रशासनाने ३ दिवस दुर्लक्ष केल्यामुळे युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे आणि शिवसैनिक डी.वाय. घुगे या दोघांनी स्वखर्चातुन  मातीचा भराव टाकत पुलाची दुरुस्ती केली. यामुळे १२ गावातील हजारो नागरिक व विद्यार्थ्यांच्या रहदारीची वाट सुकर झाली आहे.

हिंगोली शहरासह जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून सातत्याने पाऊस झाल्यामुळे समग्याकडे जाणारा पुल पुर्णत: ढासळला होता. सहा महिन्यापुर्वीच त्याची पडझड झाली होती. जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही थातूर मातूर डागडुजी करुन सरकारी सोपस्कार पुर्ण केला. मात्र, १५ जुलै रोजी  पुल ढासळल्यामुळे समगा, येडुद, कंजारा, वसई, पुर, धामणी, निशाणासह १२ गावांचा संपर्कबंद झाला होता.

युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी दिलीप घुगे यांनी या पुलाची पाहणी केली. त्यानंतर दिलीप घुगे यांच्यासह शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या सरस्वतीबाई घुगे यांचे चिरंजीव डी.वाय. घुगे यांनी प्रशासनाकडुन दुर्लक्ष होत असल्याने पुलाची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. २० च्यावर टिप्परव्दारे मातीचा भराव टाकुन या पुलावरील वाहतुक पुर्ववत होईल. यासाठी घुगे द्वयींनी स्वखर्चातुन पदरमोड करत नागरिकांसाठी वाहतुकीचा मार्ग मोकळा केला.

शिवसैनिकांच्या या कामाचे बाराही गावातील नागरिकांनी  स्वागत केले असुन शिवसेनेचे आभार व्यक्त केल्याचे घुगे यांनी सांगितले आहे. या पुलाची उंची वाढवुन नव्याने पुलाचे बांधकाम करण्यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तातडीने तयार करुन मंजुरी घेत पावसाळ्यानंतर बांधकाम करण्याची मागणी देखील डी.वाय. घुगे व दिलीप घुगे यांनी केली आहे.

दरम्यान, तहसीलदार गजानन शिंदे आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी करत सरकारी कर्तव्य पार पाडले. परंतु, तीन दिवसात प्रशासन जागचे हलले नाही. शिवसैनिकांनी स्वखर्चातुन काम करुन सरकारी यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घातले आहे.