गौरी पूजनाच्या रात्री केळशीत रंगला हाती पेटत्या मशालींच्या पलेत्यांचा नाच

आलेली गवर फुलून जाय….., माळयावर बसून पोळया खाय….. अशाप्रकारची ऐकापेक्षा एक अशी ग्रामीण कोकणी ढंगातील लयबध्द चालीवरील गौरी गणपतीची गाणी गात हाती पेटत्या मशालींचा साहसी पलेत्यांचा पांरपारिक नाच केळशी येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. हा नाच पाहण्यासाठी खासकरून दुर दुरवरून लोक केळषीत दाखल झाले होते. हा पलेत्यांचा नाच त्यांनी प्रत्यक्ष ऑखो देखा हाल पाहीला आणि एका अनोख्या नाचाचा मनमुराद आनंद घेतला.

गेल्या कित्येक वर्षापासून पलेत्या नाचाच्या सांस्कृतिक पंरपरेच्या वारशाचा अमूल्य ठेवा केळशी गावाने आजही अगदी त्याच भावनेने जपून ठेवला आहे. असा हा धाडसी आणि साहसी खेळ राज्याच्याच काय तर देशातही कुठेच नाचला जात नाही तो पेटत्या मशाली हाती घेत नाचण्याचा प्रकार अर्थात पलेत्यांचा नाच आपल्याला केळशी या गावात गौरी पूजनाच्या दिवशी दरवर्षी पाहायला मिळतो.

डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी, अंगात सदरा आणि पायजमा किंवा धोतर परिधान केलेले लोक हे हाती पेटत्या मशाली घेऊन पारंपरिक ढोल सनई टिमकी वाद्यांच्या तालावर अगदी ठेक्यात मुखी नाम घोष आणि गौरी गणपतीचीं गाणी गात थिरकत ग्रामदैवत श्री कालभैरव देवस्थान परिसरात येतात. श्री कालभैरव मंदिरासमोरील परसावर तसेच परासासमोरील रस्त्यावर हाती घेतलेल्या पेटत्या मशाली नाचवतानाचे विहंगम दृश्य हे अक्षरशः डोळयाचे पारणे फेडणारे असेच असते. त्यातच आपल्या पावंडयावर नाचणारे आणि मुखाने गौरी गणपतीची गाणी गाणारे सोबतच पारंपारीक वादय यांचा सुरेख मेळ हा ला जबाब असाच असतो. श्री. कालभैरवासमोर केळशीवासीय जणू भवानीचा गोंधळच घालतात असे ते नयनरम्य दृष्य असते. असा हा पलेत्याचा नाच आपल्याला केळशी या गावाशिवाय अन्यत्र कुठेच पाहायला मिळत नाही.

केळशी हे गावच मुळात सांस्कृतिक परंपरा जपणारे गाव आहे या गावातील श्री महालक्ष्मीचा रथउत्सव असो अथवा गोकुळाष्टमीतील दहीकाला उत्सवातील गोविंदा असो अथवा कालभैरवासमोरील नामसप्ताह असो असे किती तरी सण उत्सव हे केळशी गावात एकीने वर्षोनुवर्ष साजरे करण्यात येतात. त्यात कुठेच अहमपणाची भावना नसते. अशा या उत्सवांची परंपरा ही कित्येक वर्ष सुरू असून येथील सण उत्सवांचे जराही महत्व कमी झालेले नाही. सण उत्सवांची सांस्कृतिक परंपरा जोपासणारे केळशी गावाचे हे एक विशेष आहे.