19 मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी मदरशामधील शिक्षकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोट्टायम

लहान मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यात असणाऱ्या मदरशामधील एका शिक्षकाला पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. युसूफ असे या 63 वर्षीय शिक्षकाचे नाव आहे. एका समितीने केलेल्या तक्रारीनंतर थलायोलापरांब्यू पोलिसांनी कोडंगुलूर येथून शिक्षकाला अटक केली.

मशिदीची कार्यकारी संस्था असणाऱ्या महाल्लु समितीने याबाबत तक्रार दाखल केली होती. आरोपी शिक्षक युसूफवर 19 लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पीडित मुलांच्या पालकांनी यासंबंधी कोणतीही तक्रार दाखल न केल्याने शिक्षकाला अटक करण्यात आली नव्हती, परंतु आता समितीने तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, अटकेनंतर आरोपी शिक्षकाने 25 वर्षाचा असल्यापासून लहान मुलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे कबूल केले आहे. तसेच तो स्वत: देखील लहानपणी लैंगिक शोषणाचा बळी झाला होता, असेही त्याने सांगितले. लहान मुलांना कायद्यांची माहिती नसल्याने ते याबाबत कोठेही वाच्यता करणार नाही आणि आपण कधीच पकडले जाणार नाही, असा आरोपी शिक्षकाला विश्वास होता. परंतु समितीने तक्रार केल्यानंतर त्याची पोलखोल झाली.