केरळ नन बलात्कार प्रकरण, बिशपची निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळ येथील नन बलात्कार प्रकरणी आरोपी बिशप फ्रँको मुलक्कल याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हे प्रकरण 2018मधील असून या बिशपवर बलात्कार आणि धमकी देण्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणी सबळ पुराव्याअभावी बिशपची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकाचे प्रमुख एस. हरिशंकर यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

28 जून 2018 मध्ये 43 वर्षांच्या ननने कोट्टायममध्ये पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली होती. बलात्कार पीडित महिला पंजाब स्थित ‘मिशनरी ऑफ जिजस मंडळा’ची सदस्य आहे. फ्रँको हा जालंधर येथील एका चर्चचा माजी पाद्री आहे. ननने केलेल्या आरोपांनुसार, 2014मध्ये हिमाचल प्रदेशच्या एका गेस्ट हाऊसमध्ये फ्रँकोने तिच्यावर बलात्कार केला होता. दोन वर्षांमध्ये त्याने 14 वेळा तिच्यावर बलात्कार केला.

2015 ते 2017मध्ये फ्रँकोने पीडितेसोबत चॅटिंग आणि व्हिडीओ कॉल या मार्फत संभाषण केलं होतं. तिला बिशपची भीती वाटत असल्याने ती दोन वर्षं गप्प होती. मात्र, नंतर तिने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली होती.

ननच्या तक्रारीवरून फ्रँकोला सप्टेंबर 2018मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात 2019मध्ये आरोपपत्र दाखल केलं गेलं. ही तक्रार रद्द व्हावी यासाठी फ्रँकोने केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तक्रार रद्द करण्यास दोन्ही न्यायालयांनी नकार दिला होता. या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण करण्यात आली. या खटल्यात एकूण 83 साक्षीदार आणि 30 हून अधिक पुराव्यांच्या आधारे युक्तिवाद करण्यात आला. मात्र, सबळ पुरावे नसल्याने बिशपची सुटका करण्यात आली आहे.

पीडितेला या निर्णयाने धक्का बसला आहे. ही लढाई अशीच पुढे सुरू राहणार असल्याचं नन आणि तिच्या समर्थकांचं म्हणणं आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पीडित ननच्या साथीदार सिस्टर अनुपमा यांनी दिली आहे.