महिलेकडे जेवायलाही नव्हते पैसे, 500 मागितल्यावर लोकांनी केली 50 लाखांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमध्ये आर्थिक परिस्थितीशी झुंजत असलेल्या महिलेने मुलांच्या शिक्षिकेकडे 500 रुपये उधार मागितले होते. त्या शिक्षिकेने त्या महिलेच्या मदतीसाठी असे काही केले की तिला 50 लाखांची मदत मिळाली. जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे ते.

बीबीसीच्या वृत्तानुसार, सुभद्रा (46) असे त्या महिलेचे नाव आहे. नवऱ्याचे निधन झाल्याने या महिलेकडे मुलांना खायला घालायलाही पैसे नव्हते. अशात त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षिकेकडे 500 रुपये उधार मागितले होते. आपल्या विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती पाहून शिक्षिका भावूक झाली. तिने सोशल मीडियावर त्यांच्या मदतीसाठी क्राऊडफंडिग अभियान सुरु केले. कारण थोडे पैसे आणखी जमा करुन त्यांची काहीतरी मदत करता येईल.

सुभद्रा नोकरी करु शकत नाही. कारण तिच्या तीन मुलांपैकी सगळ्यात लहान मुलाला सेरेब्रल पाल्सी आजार आहे. अशाप्रकारच्या मुलांना योग्य देखरेखेची गरज असते. गेल्या शुक्रवारी सुभद्राने स्थानिक शाळेतील शिक्षिका गिरिजा हरिकुमार यांच्याकडे 500 रुपये उधार मागण्यासाठी गेल्या होत्या. तिच्या मुलांना घरात खायला काहीच नव्हते. तिची परिस्थिती समजून गिरिजा यांनी तिला एक हजार रुपये दिले. यानंतर गिरिजा तिच्या घरी गेल्या आणि त्यांना समजले की ती खरोखरच खूप हलाखीत जगत आहे. स्वयंपाकघरात त्या गेल्या असता घरात तिच्या मुठभर धान्य होते आणि मुलांकडे खायला काहीच नव्हते. अशावेळी तिला 1000 रुपये केलेली मदत फारच शुल्लक होती. ती तिच्या कुटुंबासाठी अपुरी पडेल. म्हणूनच क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली, जेणेकरून मोठी रक्कम गोळा करता येईल.

गिरीजा यांनी सुभद्राची मदत करण्यासाठी फेसबुकवर सुभद्राच्या कुटुंबीयांच्या स्थितीबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लोकांना सुभद्राला मदत करण्याचे आवाहन केले आहे. सुभद्राच्या बँक खात्याचा तपशीलही पोस्टात देण्यात आला होता. ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि सुभद्राच्या खात्यात 50 लाखांहून अधिक रुपये आले. सोमवारपर्यंत सुभद्राला क्राऊडफंडिग करुन 54 लाख 30 हजार रुपये मिळाले.