महाराष्ट्राचा केशर आंबा निघाला लंडनला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

हापूसनंतर खवय्यांचे विशेष प्राधान्य असलेला महाराष्ट्राचा केशर आंबा आज जेएनपीटी बंदरातून लंडनला समुद्रमार्गे रवाना झाला. एपीमसीच्या फळ बाजारातील व्यापाऱयांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला तर रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या युरोपमधील निर्यातीला चांगला वाव मिळणार आहे.

एपीमसीच्या फळ बाजारातील व्यापारी बॉम्बे एक्सपोर्टचे मालक आनंद शेजवळ यांनी चार हजार डझन केशर आंबा आज लंडनला पाठवला. हा आंबा पाठवण्यासाठी सी.ए. कंटेनरचा वापर करण्यात आला आहे. या कंटेनरमध्ये आंबा व्यवस्थित ठेवण्यासाठी विशिष्ट वातावरण तयार केले जाते. जेएनपीटी बंदरातून समुद्र मार्गे निघालेला हा आंबा 23 दिवसांच्या प्रवासानंतर लंडनच्या बंदरात पोहचणार आहे. आंबा लंडनला निर्यात करण्यापूर्वी त्याच्यावर हॉट वॉटरची प्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये 48 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात आंबा 52 मिनिटे ठेवला जातो. त्यामुळे आंब्यावर फळ माशी राहत नाही.

समुद्र सफारीची पहिली वेळ
समुद्रमार्गे लंडनला आंबा पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी एपीएमसीमधील कोणत्याही व्यापाऱयाने समुद्रमार्गे आंबा लंडनला पाठवला नव्हता. शेजवळ यांनी पाठवलेल्या आंब्याला तिथे चांगला प्रतिसाद मिळाला तर हापूसच्या निर्यातीला चांगले दिवस येणार आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.

हवाई मार्गापेक्षा खर्च कमी
लंडनला विमानाने आंबा पाठवण्यासाठी एका डझनला 400 रुपये खर्च येतो. सध्या जेट विमान कंपनीची सेवा बंद झाली आहे. त्यामुळे हा खर्च 25 टक्क्यांनी वाढला आहे. समुद्र मार्गे बोटीने आंबा पाठवण्यासाठी एका डझनला फक्त 80 रुपये खर्च येत आहे. जवळपास चार पटीने खर्च कमी येत असल्याने ही निर्यात फायदेशीर ठरणार असल्याची प्रतिक्रिया एपीमसीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली.