पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते कशेडी बोगद्याचे भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

राज्याचे गृहनिर्माण व उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते आज कशेडी बोगदा कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर होत असलेल्या या बोगद्याचे काम झाल्याने कशेडी घाट चढण्यासाठी 22 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी 40 मिनीटे लागत होती. ते अंतर आता या बोगद्यामुळे केवळ 9 मिनीटात पार करता येणार आहे, असे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी सांगितले. कशेडी बोगद्याचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाशकुमार सोनाणे, तहसिलदार अमोल कदम, राष्ट्रीय महामार्गाचे श्री. गायकवाड, सचिन कदम, राजा बेलोसे, भास्कर दरेकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. वायकर म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वरती कशेडी घाटात वेडीवाकडी वळणे असल्याने तेथील अंतर गाठण्यासाठी जास्त वेळ लागत होता तसेच घाटामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्घटना होतात त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन कशेडी घाटात बोगदा व्हावा अशी येथील जनतेची व आपली मागणी होती हे काम आज होत असून या कामासाठी भूसंपादनाच्या रक्कमेसह हे काम करण्यासाठी अंदाजित 743 कोटी खर्च अपेक्षित आहे. यामध्ये एकसमान तीन पदरी दोन बोगदे असणार आहेत.

ते पुढे म्हणाले, कशेडी येथील हा बोगदा झाल्याने रत्नागिरीकडे येणारा मार्ग सहज सोपा सरळ विना अपघाताचा होणारा आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळून पर्यटनातही वाढ होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला कशेडी येथील ग्रामस्थ,लोकप्रतिनिधी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शासकीय विश्रामगृहाचे पुर्नबांधणी कामाचे भूमिपूजन
राज्याचे गृहनिर्माण राज्याचे गृहनिर्माण व उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते खेड येथील शासकीय विश्रामगृह पुनर्बांधणी कामांचे भूमिपूजन झाले. यावेळी सचिन कदम, राजा बेलोसे, उपविभागीय अधिकारी अविनाशकुमार सोनाणे, तहसिलदार अमोल कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सदर पुनर्बांधणी कामांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये आठ खोल्या बांधण्यात येणार आहेत.