
खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा हिंदुस्थानविरोधात एक वक्तव्य केले आहे. 13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याची आठवण करून देणारा व्हिडीओ पन्नू याने प्रसिद्ध केला आहे. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून हे अधिवेशन सुरू असतानाच त्याने हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
2001 च्या संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूचे पोस्टर झळकावत आणि ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ असे शीर्षकही असलेला व्हिडीओ पन्नूने प्रसिद्ध केला असून यात पन्नूने धमकी दिली आहे की, हिंदुस्तानी एजन्सींनी माझ्या हत्येचा कट रचला होता जो अयशस्वी झाला. याला उत्तर देण्यासाठी मी 13 डिसेंबरला संसदभवनावर हल्ला करणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI च्या K-2 (काश्मीर-खलिस्तान) डेस्कने पन्नूला हिंदुस्तान विरोधी विधाने करण्याचा अजेंडा सुरू ठेवण्यास सांगितले आहे. अफझल गुरूचे नाव घेऊन कश्मीिरी दहशतवाद्यांच्या आणि काश्मीर हे पाकिस्तानचेच आहे याचे समर्थन करण्यासही पन्नूला पाकिस्तानने सांगितल्याचे कळते आहे. पन्नूचा हा व्हिडीओ समोर आल्यामुळे सुरक्षायंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
पन्नू यांनी यापूर्वीच धमकी दिली आहे
पन्नूने काही काळापूर्वी असाच एक व्हिडिओ जारी केला होता. त्यामध्ये त्याने 19 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू नका, अन्यथा तुमच्या जीवाला धोका आहे अशी धमकी दिली होती.


























































