
खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पंजाबमधील मोस्ट वॉन्टेट खलिस्तानी दहशतवादी सुख बिकरीवाल याला दुबईतून हिंदुस्थानात परत आणण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा दलाला मिळालेले हे मोठे यश आहे.
सुख बिकरीवाल पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणेच्या (आयएसआय) इशाऱ्यानुसार पंजाबमध्ये हत्याकांड घडवत होता. पंजाबमधील शौर्यचक्र विजेते बलविंदर संधु यांच्या हत्येत बिकरीवाल याचा हात होता. तसेच पंजाबच्या नाभामध्ये तुरुंग तोडण्याच्या घटनेतही तो सहभागी होता. आता त्याला पकडून हिंदुस्थानात परत आणण्यात यश आले आहे.
बिकरीवाल याची चौकशी करण्यात येणार असून पंजाबमधील खलिस्तानी दहशतवाद्यांची माहिती मिळणार असून अनेक हत्याकाडांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाबमधील टारगेट किलिंगबाबतचा तपास यंत्रणांनी पूर्ण केला आहे. त्यात आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवाद्यांचे संगनमत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयएसआयच्या इशाऱ्यावरच सुख बिकरीयाल याने शिवसेना नेते हनी महाजन यांच्यावर शूटरकडून गोळ्या झाडल्या होत्या. त्यात महाजन यांना 4 गोळ्या लागल्या. तसेच बलविंदर संधू यांची हत्याही त्याने योजनाबद्ध पद्धतीने केली होती. आयएसआय आणि खलिस्तानी दहशतवाद्यांमध्ये मध्यस्तांचे काम बिकरीवाल करत होता.



























































