धोकादायक भोस्ते घाट होणार इतिहासजमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। खेड

मुंबई गोवा महामार्गावरील अवघड भोस्ते घाट पोखरण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या घाटातील अपघातस्थळ म्हणून ओळखले जाणारे एक अवघड वळण चौदपरीकरणादरम्यान काढून टाकण्यात आले आहे तर दुसऱया काटकोनात वळणाऱया धोकादायक वळणावर दरीच्या बाजूला मजबुत संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. अपघातांचा धोका कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी भोस्ते घाट पुर्णपणे तोडला जात असल्याने चौदपरीकरणात धोकादायक भोस्ते घाट इतिहासजमा होणार आहे

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाट केवळ पाच किलोमीटरचा असला तर घाटातील अवघड वळणांमुळे हा घाट अतिशय धोकादायक मानला जातो. या घाटात काटकोनात वळणारी दोन अवघड वळणे ही चालकांच्या मनात धडकी भरवणारी आहेत. तीव्र उतार असलेला घाट उतरताना चालकाचे लक्ष जरादेखील विचलित झाले तर या दोन्ही ठिकाणी अपघात हा ठरलेलाच! या दोन वळणांवर आतापर्यंत अनेक भीषण अपघात झाले असल्याने या घाटातून गाडी काढताना चालकांची कसोटी लागते.

घाटातील अपघातांचा धोका कायमस्वरुपी निकाली निघावा यासाठी महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान तीव्र उतार कमी करण्याबरोबरच धोकादायक वळणांचा अडसर दुर करण्याला प्राधान्य दिले जात आहे. रस्त्याचे सर्व्हेक्षण करतानाच ती खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झालेल्या दोन धोकादायक वळणांपैकी एक धोकादायक वळण इतिहासजमा झाले आहे. काटकोनात वळणारे दुसरे अवघड वळण टाळणे शक्य नसल्याने या ठिकाणी दरीच्या बाजुला मजबुत संरक्षक भिंत उभारली जात आहे. या वळणाच्या ठिकाणी रस्त्यांची रुंदीही जास्तीतजास्त वाढवली जाणार असल्याने या वळणांवरील अपघातांचा धोकाही कायमस्वरुपी निकाली निघणार आहे.

खेड तालुक्याच्या हद्दीत येणाऱया 44 किलोमिटरच्या चौपदरीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. काही ठिकाणी रस्ता क्रांक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याने या ठिकाणी वाहतुक सुरुही करण्यात आली आहे. मे 2019 अखेर संपुर्ण 44 किलोमीटरच्या एका बाजूचे क्रॉंक्रिटीकरण पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे किमान खेड तालुक्याच्या हद्दीत होणाऱया भिषण अपघातांना आपुसकच आळा बसणार आहे.

सद्यस्थितीत खवटी, उधळे, कळंबणी, भरणे नाका, भोस्ते घाट, बोरज, निगडे, या ठिकाणी चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. काही ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामात अडसर ठरणारी झाडे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. भरणे नाका ते भरणे जाधववाडी दरम्यान चौपदरीकरणाच्या आड येणारी दुकाने, घरेही जमीनदोस्त करण्यात येत आहे. गजबजलेल्या भरणे नाका परिसरातील दुकाने अद्याप जमीनदोस्त करण्यात आली नसली तरी येत्या काही दिवसात या ठिकाणच्या दुकानांवरही हातोडा पडण्याची शक्यता आहे.