तळे येथील रेशन दुकानात रॉकेलचा काळाबाजार; स्टिंग ऑपरेशन करून काळाबाजार केला उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्व सामान्यांना कमी दरात धान्य, रॉकेल मिळावे यासाठी शासनाने रेशन दुकान हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र रेशन दुकान चालविणारे काही चालक याचा गैरफायदा उचलत रेशन दुकानातील धान्याचा, रॉकेलचा काळाबाजार करून स्वतःचे उकळ पांढरे करण्याचा प्रयत्न करत आहेत . अशाच एका दुकानात सुरु असलेल्या रॉकेलच्या काळा बाजाराचा पर्दाफाश खेड तालुक्यातील तळे येथील ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांनी स्टिंग ऑपरेशन करून रॉकेलचा काळाबाजार चव्हाट्यावर आणला असून या दुकान चालकावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

खेड तालुक्यातील तळे शिगवण वाडी येथील ग्रामस्थांना गेले अनेक महिने रॉकेल मिळत नव्हते. याबाबत ग्रामस्थांनी रेशन दुकानदार यांच्याकडे चौकशी केली असता दुकानदार कायम टाळाटाळ करत असे. वारंवार विचारणा करणाऱ्या ग्रामस्थांना हा दुकानचालक शिवीगाळ देखील करत असे. दुकानात येणाऱ्या रॉकेलचा काळाबाजार केला जात असल्याचा संशय असलेल्या ग्रामस्थांनी दुकानदाराच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते.

एके दिवशी ग्रामस्थांसाठीचे रॉकेल खासगी वाहनामध्ये भरून विकले जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. जागृत नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. हा विडिओ रेकॉर्ड करताना दुकानदाराने पाहिल्यावर त्याच्या अंगाची आग आग झाली होती. त्याने व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्यांना शिवीगाळ करून ” जा तुम्हाला काय करायचे असेल ते करा ” अशी दमबाजी केली होती.

रॉकेलचा अशा प्रकारे काळाबाजार होणे गंभीर बाब असल्याने ग्रामस्थांनी खेड तहसीलदर कार्यालय गाठून खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. या दुकानदारावर तात्काळ कारवाई न झाल्यास येथील ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.