खेड तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; तहसीलदारांचा अहवाल पॉझिटिव्ह

खेडच्या तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तालुक्याचा प्रशासकीय कारभार हाकणाऱ्या तहसीलदारांनाच कोरोनाची लागण झाली आहे. तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तहसील कार्यालयात सध्या नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. शहराप्रमाणे ग्रामीण भागातून येणारे कोरोनाबाधितांचे आकडेही चिंता वाढविणारे आहेत. तसेच मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र, तहसीलदारांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या आधी पंचायत समिती, पोलीस स्थानक, नगरपरिषद या शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला होता. पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी, त्यांचे वाहनचालक, स्वीय सहाय्यक, काही पोलीस, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह काही कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वानी कोरोनावर मात करून पुन्हा कामाला सुरवात केली आहे. मात्र, आता तालुका प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या तहसीलदार कार्यालयामध्ये कोरोनाने शिरकाव झाल्याने कार्यालय नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या