
खेलो इंडिया बीच स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या कबड्डी संघाने विजयी घोडदौड कायम राखत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. साखळीतील दुसऱ्या लढतीत उत्तराखंडला महाराष्ट्राने धुळ चारली. बीच सॉकरमध्येही महाराष्ट्राच्या पुरूष संघाने अरूणाचल प्रदेशचा पराभव करीत विजयी सलामी दिली.
दीवमधील घोघला समुद्र किनाऱ्यावर रंगलेल्या बीच कबड्डीत महाराष्ट्राने उत्तराखंडचा ४३-३३ गुणांनी पराभव करीत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. लढतीतच्या सुरूवातीपासून महाराष्ट्राने आपले वर्चस्व गाजवले. अभिषेक गुंगेने पहिलीच चढाई यशस्वी करीत महाराष्ट्राचे खाते उघडले. पाठोपाठ दादासो पुजारने यशस्वी पकड घेत मैदान गाजवले. अभिषेक गुंगेसह सुरज दूंदळेने यशस्वी चढाया केल्या. पूर्वार्धात उत्तराखंडने कडवी झुंज दिली. पूर्वार्धात १९-१८ गुणांसह केवळ १ गुणांनी महाराष्ट्र आघाडीवर होता. उत्तरार्धात आक्रमक खेळ करीत महाराष्ट्राने १० गुणांनी लढत जिंकली. सलग दोन विजयामुळे महाराष्ट्राने उपांत्य फेरीतील प्रवेशासह पदकही निश्चित केले आहे.
बीच सॉकरमध्ये महाराष्ट्राच्या पुरूष संघाने अरूणाचल प्रदेशला ६-३ गोलने पराभव केले. महाराष्ट्रासाठी ४ थ्या मिनिटाला समर्थ कांबळेने पहिला गोल करून आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडवले. पाठोपाठ मानस मोरेने २२ व्या व ३२ व्या मिनिटाला सलग दोन गोल केले. पूर्वाधात ३-३ गोलची बरोबरी केल्याने सामन्यात चुरस कायम राहिली. उत्तरार्धात महाराष्ट्राची हुकुमत प्रकटली. कवीश दवणेसह साहिल डोंगरेने दोन गोल करीत ६-३ गोलने लढत जिंकून विजयी सलामी दिली. महाराष्ट्राची दुसरी लढत हिमाचल प्रदेशविरूद्ध रंगणार आहे.


























































