नाटकवाली होणार!!

>>खुशबू हारेर, माटुंगा

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना, तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं. लहानपणापासूनच माझा अभिनयाकडे कल असल्याचे माझ्या घरच्यांनीही ओळखलं होतं. घरी असायचे तेव्हा वेगवेगळे चित्रपट पाहणं, कलाकारांच्या मुलाखती पाहणं, एवढेच नाही तर त्यांचे अभिनय पाहून आरश्यासमोर उभी राहून त्यांच्या नकला करणं यातच मला मजा वाटायची. त्यामुळे कलाकारांच्याच नव्हे तर सामान्य माणसाचेही मी निरीक्षण करायला लागले. त्यांचं बोलणं, चालणं या गोष्टी मी समजून घ्यायला लागल्याने त्यांच्या नकलाही मला सहज करता येऊ लागल्या.

माझी अभिनयाची आवड प्रत्यक्षात साकारण्याची संधी मला सातवीत असताना मिळाली. शाळेचं स्नेहसंमेलन होतं आणि त्यात मला संधी मिळाली. मी त्यावर प्रचंड मेहनत घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात माझ्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. म्हणून मला पारितोषिक मिळालं. खरं तर ती माझ्या अभिनयाची पोचपावतीच होती. पण तेव्हाच ओळखलं की, मी चांगला अभिनय करू शकते. नाटक हा अभिनयाचा पाया मानला जातो. त्यानंतर अकरावीला माटुंग्याच्या गुरु नानक खालसा कॉलेजात असताना अभिनयाची कार्यशाळा होती. मी त्या कार्यशाळेत सहभागी झाले. तिथे मला माझ्यासारखेच खूप मित्रमंडळ मिळालं. आमचा नाटकाचा छानसा ग्रुप तयार झाला. नाटक करताना कळलं की, अभिनय काय असतो, एकांकिका म्हणजे नेमकं काय, पथनाटय़ कसं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅकस्टेजचा अनुभव मला तेव्हाच मिळाला. हे सगळं खरंच शिकण्यासारखं असतं. आजही दररोज मला काहीतरी नवीन शिकायला मिळतंच. त्यामुळे अजूनही मी त्या थिएटर ग्रुपमध्ये आहे. अभिनय, नाटक याबद्दल शिकतेच आहे. अभ्यासाबरोबरच माझ्यात असलेली अभिनयाची आवड जेपासतेय.