बस अडवून विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा प्रयत्न: तीन तरुणांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

एसटी बस जबरदस्तीने थांबवून एसटीतील विद्यार्थिनीला काही तरुणांनी बळजबरीने उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र बसच्या चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे तरुणांचा प्रयत्न फसला. या प्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे पालकांत भीती निर्माण झाली आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने खास विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीसाठी मानव विकासच्या बसेस चालविण्यात येतात. काल ११ फेब्रुवारी रोजी (एमएच-०६ एस- ८७०५) ही बस अंबडहून विद्यार्थ्यांना घेऊन कुंभारपिंपळगावकडे जात असताना या बसचा ३ तरुणांनी पाठलाग केला. बोधलापुरी येथे दुपारी २.४० वाजता बस येताच त्या तरुणांनी बसला कट मारून बससमोर मोटारसायकल आडवी लावली. आतील एका विद्यार्थिनीला खाली उतरवा, असे सांगितले. मात्र वाहक श्रीपाद वाघ्रुळकर व चालक भगवान आव्हाड यांनी प्रसंगावधान राखत याला विरोध केला. त्यामुळे चालक भगवान आव्हाड यांना तरुणांनी शिवीगाळ केली. या प्रकारामुळे पालकांत खळबळ उडाली असून, बसचे चालक भगवान आव्हाड यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात सत्यवान भगवान सोनवणे व इतर दोन तरुणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.