मुलांच्या लसीकरणाला थंडा प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत 18 वर्षांवरील 92 लाख 36 हजार पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी 12 ते 14 वर्षे आणि 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. परदेशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनी थैमान घातल्याने मुलांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. 18 वर्षांवरील पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी अजूनही पालिका, खासगी आणि सरकारी अशा 295 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन असे दोन्ही डोस मोफत दिले जात आहेत. 3 जानेवारीपासून 15 ते 17 वयोगटातील आणि 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरणदेखील सुरू झाले असून त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. 15 ते 17 वयोगटातील 55 टक्के मुलांनी पहिला डोस तर 41 टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. 12 ते 14 वर्षे वयोगटातील 13 टक्के मुलांनी पहिला डोस घेतला आहे.