
सामना प्रतिनिधी । किल्लारी
व्हॉट्सअॅपचा विधायक आणि समाज उपयोगी वापर कसा करावा हे किल्लारीताल 1993 (10 वी वर्ग मित्र) या व्हाट्सअप्प ग्रुपने दाखवून देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मायेचे छत्र हरपलेल्यांना मदत करण्यासाठी ग्रुपवर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. त्यातून गरजूंना मदत करण्यावर एकमत झाले आणि या प्रयत्नांतून 51 हजाराचा निधी उभा राहिला आहे.
भागवत गुरव यांच्या आईवडिलांचा 1993 च्या भूकंपात मृत्यू झाला. त्यांचा सांभाळ त्याच्या मामांनी केला आणि त्यानंतर आपली मुलगी देऊन त्याचा संसार थाटला. भागवत यांना दोन मुली व एक मुलगा आहे. ते रोजंदारीवर काम करत होते. तर पत्नी घरकाम करत होती. मुले मोठी झाल्यानंतर त्यांचा शैक्षणिक खर्च वाढला. आर्थिक अडचण भासू लागली. कौटुंबिक वाद होऊ लागले. कौटुंबिक वादातूनच दोघांनीही जीवन संपवले. त्यांची मुले आजोळी राहू लागली. या मुलाची ही अवस्था पाहून 1993 (10 वी वर्ग मित्र) किल्लारीमधील या व्हाट्सअॅप ग्रुपने त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. आपण समाजाचे देणे लागतो व आपआपल्या परीने जितकी शक्य होईल तितकी त्यांनी केली. तसेच इतरांचीही मदत घेत 51 हजाराचा मदत निधी जमा केला.
आई वडिलांचे छत्र हरपलेल्यांना मदतीचा हात कसा देता येईल याचीच ग्रुपवर चर्चा असते. ग्रुपमध्ये विषयांतर होऊ न देता मदतीबाबतच चर्चा करण्यात आली. मदतकार्य कसे करता येईल याबाबत प्रत्येकाने मते मांडली. विशेष म्हणजे प्रत्येक सभासदाने शक्य ती मदत केली. त्यातूनच 51 हजाराचा निधी जमला. समुहाच्या प्रमुख संतोषीमाता लोहार व सचिन माने यांना ही आगळीवेगळी कल्पना सुचली. त्यांना ग्रुपमधील सर्वांनी मदत केली.


































































