किम जोंग उनची तुघलकी कारवाई; कोरोना नियम तोडणाऱ्याला गोळ्या घातल्या

उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किमजोंग उन त्याच्या क्रूरतेसाठी आणि विक्षिप्त वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता त्याच्या अशाच एका क्रूरतेची चर्चा जगभरात होत आहे. उत्तर कोरियात कोरोनाचे नियम तोडणाऱ्या आरोपीला किम जोंगने सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्याने ही चर्चेचा विषय ठरला आहे.

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी उत्तर कोरियात कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. निर्बंधांचे उल्लंघन करणारे किंवा नियम तोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाबाबतचे नियम तोडणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश किम जोंग उनने दिले आहेत. उत्तर कोरियात किमच्या अनेक फर्मानांमुळे मृत्यूदंडाची शिक्षा सर्वसामान्य झाली आहे. देशात पाळण्यात येणाऱ्या कठोर नियमामुळे उत्तर कोरियात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

आरोपीने कोरोना नियम तोडत चीनहून उत्तर कोरियात काही वस्तूंची तस्करी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे सुरक्षा दलाने त्याला अटक केली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून उत्तर कोरियाने सर्व सीमा सील केल्या आहेत. या आरोपीच्या कृत्याने किम जोंग उनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने तुगलकी आदेश जारी करत आरोपीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. त्यानंतर फायरिंग स्कॉडने 28 नोव्हेंबरला या आदेशाची अंमलबाजावणी केली.

नागरिकांनी नियम पाळावे आणि त्यांच्या मनात भीती असावी, यासाठी उत्तर कोरियाने सीमेवर एअरक्राफ्ट बंदूकधारी सैनिकांचे पथक तैनात केले आहे. सीमेच्या परिसरातील एक किलोमीटर परिसरात नागरिक दिसल्यास त्यांना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर कोरियात अजूनपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, उत्तर कोरियाच्या या दाव्यावर जगभरातून संशय व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या