
कर्णधार लोकेश राहुलने आयपीएलमधील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने अवघ्या 42 चेंडूंत 8 खणखणीत षटकार व 7 नेत्रदीपक चौकारांची बरसात करताना नाबाद 98 धावांची खेळी साकारली आणि पंजाब किंग्जला महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जवर 6 गडी व 42 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवून दिला. त्याचीच ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. पंजाब किंग्जने यंदाच्या मोसमातील सहाव्या विजयाला गवसणी घातली. पण गुणतालिकेत गुरुवार संध्याकाळपर्यंत हा संघ पाचव्या स्थानावरच राहिला. त्यामुळे त्यांचे प्ले ऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. चेन्नई सुपरकिंग्जलाही दहाव्या विजयापासून दूरच रहावे लागले. त्यामुळे त्यांना 18 गुणांसह दुसऱया स्थानावरच समाधान मानावे लागले.
दरम्यान, याआधी पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जच्या सर्व गोलंदाजांनी ठसा उमटवत कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. चेन्नई सुपरकिंग्जचा सलामी फलंदाज फाफ डय़ुप्लेसिसने 55 चेंडूंत 2 षटकार व 8 चौकारांसह 76 धावांची खेळी साकारली, पण त्याला कोणाचीही साथ लाभली नाही. त्याची झुंज एकाकी ठरली.
पंजाब किंग्जकडून युवा अर्शदीप सिंगने 35 धावा देत 2 बळी गारद केले. अष्टपैलू ख्रिस जॉर्डनने 20 धावा देत 2 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अनुभवी मोहम्मद शमीने 22 धावा देत 1 फलंदाज बाद केला. तसेच फिरकीपटू रवी बिष्णेई याने 25 धावा देत एका फलंदाजाला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. चेन्नई सुपरकिंग्जला 20 षटकांमध्ये 6 बाद 134 धावाच करता आल्या.
वन मॅन शो
चेन्नई सुपरकिंग्जकडून मिळालेल्या 135 धावांचा पाठलाग करणाऱया पंजाब किंग्जने 4 गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. मयांक अग्रवाल (12 धावा), सरफराज खान (0), शाहरुख खान (8 धावा), एडन मार्करम (13 धावा) यांना अपयशाला सामोरे जावे लागले. पण लोकेश राहुलच्या झंझावातात चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाजांचा पालापाचोळा झाला. लोकेश राहुलने नाबाद 98 धावांची तडाखेबंद खेळी साकारली आणि पंजाब किंग्जचा साखळी फेरीतील शेवट गोड केला.





























































