किणी – घरीच विलगिकरणात राहून कुटुंबाने केली कोरोनावर यशस्वी मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने गावा-गावांत भीतीचे वातावरण तयार होत आहे. मात्र या आजाराशी घरातूनच मुकाबला करून त्यास परतवून लावता येते हे कृतीतून सिद्ध केलंय किणी येथील एका कुटुंबाने. दोन आठवड्यापूर्वी येथील पाटील कुटूंबातील एका युवकास कोरोनाची लागण झाली. त्याच्या संपर्कात आल्याने त्याची आई, पत्नी व वहिनी यांनाही कोरोना झाला. कुटुंबातील सात पैकी चौघे बाधित झाले. त्यातील तरुणावर अतिग्रे येथे उपचार सुरू झाले. तर वृद्ध सासू व दोन सुना यांनी मात्र घरीच राहून उपचार घेण्याचा निर्णय घेतला.

भादोले आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवक सचिन मोरे, आशा स्वयंसेविका निलो फर शेख यांनी उपचार सुरू केले. दिवसातून तीन वेळा तपासणी करून औषधे देण्यात आरोग्य सेवक व अशास्वयंसेविका यांनी सातत्य ठेवले. तर गावातील डॉ. मिलींद कुंभार. डॉनितीन माळी यांचे मार्गदर्शन मिळाले. गावातील लोकांनी, शेजारी पाजारी यांची सहकार्य केल्याने अवघ्या 10 दिवसात लक्षणे कमी होऊन या सर्वांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे घरात राहून सुद्धा आरोग्य नियमांचे पालन करून कोरोनातून बरे होता येते.