
‘विक्रांत’ युद्धनौका वाचवण्यासाठी जनतेकडून कोटय़वधी रुपये गोळा करणाऱया किरीट सोमय्या आणि नील सोमय्या या पिता-पुत्राला ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स बजावले आहे. उद्या शनिवारी सकाळी 11 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहा, असे पोलिसांनी सोमय्यांना बजावले आहे.
‘विक्रांत’ वाचवण्याच्या नावाखाली किरीट आणि नील सोमय्या यांनी चर्चगेट स्थानकात क्राऊड फंडिंग केले होते. हा निधी राज्यपाल किंवा लष्कराकडे सुपूर्द करू असे तेव्हा किरीट सोमय्या म्हणाले होते, मात्र असा कोणताही निधी आमच्याकडे जमा झालेला नसल्याची माहिती राजभवनातून देण्यात आली. त्यामुळे एका माजी लष्करी अधिकाऱयाने थेट ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात धाव घेऊन सोमय्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दिली.
पोलिसांनी दोन्ही सोमय्यांविरोधात भादंवि कलम 420, 406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून उद्या सकाळी चौकशीसाठी या दोघांनी पोलीस ठाण्यात हजर राहावे असे समन्स बजावले आहे.
























































