
बर्डस ऑफ कोल्हापूरच्या वतीने पक्षीप्रेमींकडून सुरू सध्या पक्षी गणना सुरू असून, रविवारी राजाराम तलावावर तब्बल 67 प्रजातींचे 836 पक्ष्यांची नोंद करण्यात आली.
विशेष म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचरने संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेले रिव्हर टर्न (नदी सुरय) हे पक्षी सुद्धा यामध्ये नोंदवले गेले आहेत. तर कळंबा तलावासह राजाराम तलावावरही स्थलांतरित बदकांनी पाठ फिरवल्याचे यातून दिसून आल्याचे पक्षी निरीक्षक प्रणव देसाई यांनी सांगितले.
कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भाग निसर्ग संपत्तीने समृद्ध आहे. नदी,तलाव अशा पाणवठ्यावर विविध पक्ष्यांच्या प्रजाती पहावयास मिळतात. अगदी सातासमुद्रापार दरवर्षी स्थलांतर करणारे पक्षीही येथे ठिकठिकाणी दिसून येतात. पक्षीप्रेमींना तर या पक्ष्यांचे निरिक्षण आणि गणना करण्याची मोठी संधी मिळते.
यातून पक्ष्यांच्या विविध प्रजाती सह वाढती आणि घटती संख्या, वातावरणातील बदल याचाही यातून अभ्यास केला जातो. काही दिवसांपूर्वी कळंबा तलाव परिसरात पक्षी गणना करण्यात आली. पाठोपाठ काल रविवारी निसर्गरम्य अशा राजाराम तलाव परिसरातही सकाळी पक्षी गणना पार पडली.
गेल्या वर्षी राजाराम तलावावर पक्षी गणनेत 63 प्रजातींचे 454 पक्षी नोंदवले गेले होते. यावेळी 67 प्रजातींचे 836 पक्षी नोंदवण्यात आले.तसेच आययूसीएनने संकटग्रस्त म्हणून जाहीर केलेले रिव्हर टर्न (नदी सुरय) हे पक्षी सुद्धा यामध्ये नोंदवले गेले. यात 14 स्थलांतरित पक्ष्यांत कॉमन सॅन्डपायपर (सामान्य तुतारी), ग्रीन सॅन्डपायपर (हिरवा तुतारी), वूड सॅन्डपायपर (ठिपकेवाला तुतारी), कॉमन ग्रीनशांक (सामान्य हिरवा टीलवा ), क्लॅमरस रीड वोब्लर (दंगेखोर बोरु वटवट्या), ब्लिथस रीड वोब्लर (ब्लिथचा बोरु वटवट्या), पॅडीफील्ड वोब्लर (धान वाटवट्या), बुटेड वोब्लर (पायमोज वटवट्या), रोजी स्टारलिंग (गुलाबी मैना ), टायगा फ्लायकेचर (लाल कंठाची माशीमार), ब्राउन श्राइक (तपकिरी खाटिक), ब्लिथस पीपीट (ब्लिथची तिरचिमणी), येल्लोव वॅगटेल (पिवळा धोबी), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी) नोंदवले गेले. राजाराम तलावावरही स्थलांतरित बदकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.
ज्येष्ठ पक्षी मित्र दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव देसाई, सत्पाल गंगलमाले अभिषेक शिर्के, ऋतुजा पाटील, स्वप्नील असोडे आदींनी या मोहिमेचे आयोजन केले होते. येत्या 17 जानेवारी रोजी शिवाजी विद्यापीठ आणि 24 जानेवारी रोजी ऐतिहासिक रंकाळा तलाव परिसरातही पक्षी गणनेचा अनुक्रमे तिसरा व चौथा टप्पा होणार असल्याचे प्रणव देसाई यांनी सांगितले.
























































