
‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत स्तर 4 चे निर्बंध जिह्यात आजपासून लागू होताच कोल्हापूरकरांनी खरेदीसाठी दिवसभर गर्दी केली. रस्त्यावर वर्दळ वाढल्याने ठिकठिकाणी ट्रफिक सिग्नल सुरू करावे लागले. दरम्यान, एकीकडे जिह्यात कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूदर काहीसा कमी आला असतानाच आणखी शिथिल झालेल्या निर्बंधांचा फायदा घेत नागरिक बाहेर पडल्याने जिल्हा प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
वर्गवारी करून शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे नागरिक आज मोठय़ा प्रमाणात बाहेर पडले. अत्यावश्यक सेवेतील व्यवसायाच्या वेळेत सायंकाळी चारपर्यंत मुभा दिली असतानाच अन्य दुकानेही उघडी राहिल्याने स्थानिक प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती.
रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट, बाहेर गर्दी
कोरोनामुळे प्रवाशांअभावी एक महिन्यापासून कोल्हापुरातून विविध मार्गांवर धावणाऱया महत्त्वाच्या रेल्वे बंद आहेत. सध्या कोयना, तिरुपती आणि आठवडय़ातून एकदा शुक्रवारी धावणारी धनबाद या गाडय़ा सुरू आहेत. धनबाद वगळता कोयना आणि तिरुपती या गाडय़ांना प्रवाशांचा फारसा
प्रतिसाद नाही.
कोल्हापूर-पुणे एस.टी.च्या फेऱया वाढल्या
एक महिना बंद असलेल्या एस. टी.ची सेवा आजपासून 50 टक्के प्रवाशांवर कोल्हापूर, पुणे, कोकण तसेच सोलापूर मार्गावर सुरू झाली. सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कोल्हापुरातून पुण्याला आठ, तर पुण्याहून कोल्हापुरात सहा बस आल्या होत्या. मुंबईसाठीही बस सोडण्यात आल्या. कोकण आणि सोलापूर मार्ग सुरू करण्यात आले आहेत.






























































