
महानगरपालिका निवडणुकीनंतर आता तब्बल साडेसात वर्षांनंतर कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी तब्बल साडेसहा तास चालली. नूतन नगरसेवकांनी पाणी, कचरा अन् ड्रेनेजच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले. बहुतांश विभागांचे अधिकारी नवीन, तसेच अतिरिक्त प्रभारी असल्याने नगरसेवकांच्या प्रश्नांवर उत्तरे देताना त्यांची भंबेरी उडाल्याचे दिसून आले. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांसंदर्भात अधिकाऱयांनी दिलेल्या मुदतीत उत्तरे दिली पाहिजेत, असा आदेश महापौर रूपाराणी निकम यांनी दिला.
कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत शाहू सभागृहात झाली. यावेळी विषय समितीच्या निवडी जाहीर करून पुरवणी कार्यपत्रिकेतील सर्व ठराव मंजूर करण्यात आले. प्रश्नोत्तरावेळी पाणी, कचऱयाचा मुद्दा उपस्थित करत, नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना शहरात तीन-तीन दिवस पाणी नसते ही लाजिरवाणी बाब असल्याचे सांगत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला जबाबदार धरले.
दरम्यान, सर्व विषय समित्यांच्या निवडी जाहीर केल्या असल्या तरी त्यांना सेवा-सुविधा देण्यास प्रशासन सक्षम आहे का? असा सवाल करत विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी पदाधिकाऱयांचा सन्मान राखला पाहिजे, त्यांना सेवा द्यायला हव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच शहराच्या हद्दवाढीसाठी महापालिकेने एक निवेदन सरकारला द्यायला हवे, अशी लाटकर यांच्या मागणीनंतर त्यासंदर्भात महापौर निकम यांनी हद्दवाढीसाठी सगळे मिळून प्रयत्न करुया, असे सांगितले.
‘त्या’ अधिकाऱयावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
– एका बिल्डरने विनापरवाना बेकायदेशीर पाडलेल्या खड्डय़ांसंदर्भात परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले, आंदोलन केले तरीसुद्धा महापालिका प्रशासनाकडून दोन वर्षे गांभीर्याने दखल घेतली नाही. त्याच खड्डय़ात पडून दोन मुलांचा मृत्यू झाला. अधिकाऱयांनी नोटीस बजावली; पण कारवाई का केली नाही. गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे ‘त्या’ बेजबाबदार अधिकाऱयावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. हा खड्डा किती दिवसांत बुजवणार याचे उत्तर आयुक्तांनी द्यावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. यावेळी माहिती घेऊन सांगते, असे उत्तर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. यावर आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी नगरविकास खात्याने आदेश देऊनही हा खड्डा का बुजवला नाही. याला कारणीभूत महापालिका अधिकाऱयांची पाकीट संस्कृती आहे का, असे सवाल उपस्थित केले.
एक हजार 141 रिक्त पदे कधी भरणार?
– कोल्हापूर महापालिकेतील 1 हजार 141 रिक्त असलेली पदे कधी भरणार, असा सवाल विजयसिंह खाडे-पाटील यांनी उपस्थित केला. बिंदू नामावली 2025ला मंजूर झाली आहे. 100 टक्के अनुकंपा पदे भरली आहेत. कॉन्ट्रक्टबेसवर कर्मचारी भरताना शासनाची परवानगी घ्यावी लागेल. यावर राजेश लाटकर यांनी नोकरभरतीचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे प्रलंबित आहे. रुल्स ऍण्ड रेग्युलेशन मंजूर करा पदभरती होईल, अशी सूचना केली.


























































