कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेत सव्वातीन कोटींचा अपहार, एका महिलेसह चौघांना अटक; शाखाधिकारी फरार

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वारणानगर (ता. पन्हाळा) शाखेत पे-स्लीप तसेच धनादेशाद्वारे बोगस सह्या करून तसेच बनावट खाती उघडून 3 कोटी 21 लाख 91 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाखाधिकारी, कॅशियर, क्लार्क अशा पाचजणांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चौघांना अटक केली असून, शाखाधिकारी फरार आहे. या आर्थिक घोटाळ्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोल्हापूर शाखेचे उपव्यवस्थापक बाळासाहेब हरी बेलवळेकर (रा. कुरुकली, ता. कागल) यांनी आज कोडोली पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे. 15 जुलै 2021 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये बँकेचे वारणा शाखाधिकारी तानाजी ईश्वरा पोवार (रा. कळे, ता. पन्हाळा), क्लार्क मुकेश विलास पाटील (रा. मसूद माले, ता. पन्हाळा), कॅशियर शिवाजी शहाजी पाटील (रा. आरळे, ता. पन्हाळा), मीनाक्षी भगवान कांबळे (रा. कोडोली, ता. पन्हाळा), शरीफ मुन्ताज मुल्ला (रा. कोडोली, ता. पन्हाळा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी शाखाधिकारी पोवार यांना वगळता चौघांना अटक केली आहे.

फरारी आरोपी शाखाधिकारी तानाजी पोवार याचा पोलीस शोध घेत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, कोडोली ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग तपास करीत आहेत.