
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा अवमान करणाऱ्या वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावतविरोधात सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. शिवसेनेच्या वतीने कंगनाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भाकपकडून कंगनाच्या प्रतिमेला चपलांचा प्रसाद देण्यात आला, तर स्वातंत्र्यसैनिकांचे पुत्र नाना पालकर यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथे कंगनाला चेटकिणीची उपाधी देत पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, सुजित चव्हाण, संभाजी भोकरे, राजू यादव, शशिकांत बिडकर, मंदिर माने आदी उपस्थितीत होते.
शहर शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात कंगनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी शहरप्रमुख जयवंत हारुगले, महिला आघाडीच्या मंगल साळोखे, पूजा भोर, गौरी माळतकर, पूजा कामते, सुनीता भोपळे आदी उपस्थित होते.
कुरुंदवाड येथेही कंगनाच्या पुतळ्याला जोडे मारण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रदीप खोपडे, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक मंगल चव्हाण, तालुकाप्रमुख वैभव उगळे, शहरप्रमुख सावगावे, अण्णासाहेब भिल्लोरे उपस्थित होते.



























































