राज्य सरकारने जोमाने बाजू मांडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाला दिलेले आरक्षण कायम राहावे यासाठी आधीच्या सरकारने आणि या सरकारनेही जोमाने बाजू मांडली. जे शक्य होईल ते दोन्ही सरकारांनी केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर जास्त काही बोलू शकत नाही. हा निर्णय दुर्दैवी आहे, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, मराठा समाजासाठी हा निकाल अत्यंत दुर्दैवी आहे. आपण सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो; परंतु मराठा समाजाला आरक्षण पाहिजे अशी समाजाची भावना आहे. ते कसे मिळवून द्यायचे याबाबत राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे मार्ग काढणे गरजेचे आहे. ती सर्वस्वी जबाबदारी आपणा सर्वांची आहे. राजकारण बाजूला ठेवून या पेचप्रसंगातून मार्ग काढण्यासाठी नेहमी सहकार्य करण्याची भूमिका मी कायम घेतली होती आणि यापुढेही घेत राहीन. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मागील सरकारलादेखील माझं सहकार्य होतं आणि विद्यमान सरकारलासुद्धा नेहमी सकारात्मक सहकार्य करत आलो आहे.

कोरोना महामारी आहे; उद्रेक शब्दही काढू नका

उद्रेक होऊ नये या मताचा मी आहे. कोरोना महामारी सुरू आहे. माणसं मरत आहेत. माणसं जगली पाहिजेत याकडे लक्ष द्यायला हवे. त्यामुळे कोणी उद्रेक शब्दही काढू नका, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषदेत सांगितले.