मराठा आरक्षणासाठी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी आता बोलावं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मराठा आरक्षणासाठी समाज बोललाय, समन्वयक बोललेत, आता लोकप्रतिनिधींनी बोलले पाहिजे’ असे सांगत, येत्या दि. 16 जून रोजी छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या स्मारकस्थळाजवळ मूक आंदोलनातून लक्ष वेधण्यात येणार आहे. येथूनच सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांनी आंदोलनाला पाठिंबा देतानाच मराठा समाजाला काय देणार याची भूमिका स्पष्ट करावी आणि ती विधिमंडळातही मांडावी असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे सांगितले. 36 जिह्यांत हे आंदोलन व्यापक करण्यात येणार आहे. तरीसुद्धा सरकारने दखल न घेतल्यास पुणे ते मुंबईत मंत्रालयावर लाँग मार्च काढण्याची भूमिकाही संभाजीराजे यांनी यावेळी स्पष्ट केली.

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाज समन्वयकांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी सकल मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आता आमदार, खासदार यांनीच बोलायचे आहे. समाजासाठी आपण काय जबाबदारी घेणार हे त्यांनी येथे सांगायचे आहे. तेच त्यांनी विधिमंडळ सभागृहातही बोलले पाहिजे. आमदार, खासदार यांचा सन्मान ठेवून बोलवू. त्यांनीच समाजासमोर बोलायचे आहे. मते मागताना येता, मग समाजासाठी बोलले पाहिजे. तसेच जे आमदार, खासदार गैरहजर राहतील त्यांची आंदोलनस्थळी रिकामी पाटी लावली जाणार असल्याचेही संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले. तर आरक्षणासाठी जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे यांना दि. 12 जून रोजी कोपर्डी येथे जाऊन अभिवादन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मी जर भेटलो तर वेगळी चर्चा होईल…

पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी सरकारने संभाजीराजे यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असा मुद्दा बैठकीत एकाने काढला. पण मुख्यमंत्र्यांनी आपल्याशी राहुल शेवाळे यांच्याकडून संपर्क साधला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फोनवरून चर्चा केल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. तसेच जर आपण भेटायला गेलो असतो तर काहींनी आपण मॅनेज झालोय असा भलताच अर्थ काढला असता, असेही निदर्शनास आणले.

अराजकीय भूमिका मांडणार

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या घराण्याचा वारसदार म्हणून आपण पूर्णतः अराजकीय भूमिका मांडणार आहे. कोणताही स्वार्थ घेऊन चालणार नाही. दहा वर्षांनंतर कोणी बोट ठेवेल अशी भूमिका घेणार नाही. समाजाची दिशाभूल करणार नाही. आपल्या आंदोलनाची दिशा ही समाजाच्या हितासाठी असेल, असेही संभाजीराजे म्हणाले.