कोल्हापूर शाहुवाडीतील तबलिगी जमातीतील तरुण कोरोना मुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात पहिल्या दोन कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर आज उचत,ता.शाहुवाडी येथील तबलिगी जमातच्या तरुणाला छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला. त्याचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने,तो कोरोना मुक्त झाला. टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात त्याला घरी सोडण्यात आले. दरम्यान या तरुणाच्या संपर्कामुळे कोरोना पाॅझीटिव्ह आढळलेल्या आईचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. आठवड्यानंतर पुन्हा तिचे नमुने घेण्यात येणार आहे.

दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्या उचत,ता.शाहुवाडी येथील तरूणाला दि.9 एप्रिल रोजी कोरोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. त्याच्या संपर्कातुन आई आणि चुलत भाऊ हे सुद्धा कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले. या सर्वांवर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौदा दिवसानंतर या तरूणाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाला आहे. आज रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात या तरूणाला निरोप दिला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या तरूणाच्या हातावर होम क्वारंटिनचा शिक्का मारला. आमदार चंद्रकांत जाधव यांनी त्याला औषधे दिली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी डिस्चार्ज कार्ड वितरीत केले. यावेळी महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

बावड्यातील महिलाही कोरोनामुक्त

लाॅकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात सातारा येथुन रुग्णवाहिकेतून प्रवास करत घरी आलेल्या कसबा बावडा येथील ती वृद्ध महिलाही कोरोना मुक्त झाली आहे.चौदा दिवसानंतरचे तिचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.परंतु न्युमोनिया मुळे सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.