‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा गजर; गुलाल, खोबऱयाची मुक्त उधळण, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्री यात्रेची सांगता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हलगी, कैचाळ, ढोल-ताशा अशा वाद्यांच्या ठेक्यावर आकाशाला गवसणी घालणाऱया सासनकाठय़ांची मिरवणूक, श्री जोतिबाचा पारंपरिक लवाजम्यासह पालखी सोहळा आणि ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या अखंड गजरात, गुलाल-खोबऱयाची मुक्त उधळण करत आज वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगरावर चैत्री यात्रा मोठय़ा उत्साहात पार पडली. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून लाखो भाविक श्री जोतिबाच्या दर्शनासाठी नतमस्तक झाले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन वर्षांनंतर महाराष्ट्रासह गोवा, बेळगाव, मध्य प्रदेश आदी राज्यांतून भाविक पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यात सासनकाठी नाचवत यात्रेच्या पूर्वसंध्येला डोंगरावर दाखल झाले होते.

परंपरेनुसार आज चैत्र पौर्णिमेदिवशी चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा झाला. पहाटे 5 ते 6 या वेळेत ‘श्रीं’चा शासकीय महाभिषेक पन्हाळा तहसीलदारांच्या उपस्थितीत करण्यात आला. सकाळी 7 ते 8 वाजता महावस्त्र्ाासह महापूजा करून सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता धूपारतीसह पंचारती करण्यात आली. दुपारी हस्त नक्षत्रावर म्हालदार, चोपदारांच्या उपस्थितीत तोफेच्या सलामीने मानाच्या सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत इनाम पाडळी (जि. सातारा), मौजे विहे (ता. पाटण), करवीर कोल्हापूरची हिंमत बहादूर चव्हाण, कोल्हापूर छत्रपती, कसबे डिग्रज, ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), किवळ (जि. सातारा), कवठेएकंद (जि. सांगली) अशा मानाच्या 18 सह इतर अशा एकूण 96 सासनकाठय़ा सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तोफेच्या सलामीने ‘श्रीं’च्या पालखीचे पारंपरिक लवाजम्यासह श्री यमाई मंदिराकडे प्रस्थान झाले. सडय़ावरील ‘श्रीं’च्या विसाव्याच्या ठिकाणी अल्पकाळ विश्रांती घेऊन सूर्यास्तानंतर दिवटीच्या प्रकाशात यमाई मंदिराकडे पालखीचे प्रयाण झाले. यमाई मंदिरासमोर सदरेवर यमाई व जमदग्नीचा (‘श्रीं’च्या पालखीतील कटय़ार) प्रतीकात्मक सोहळा व सर्व विधी पार पडल्यानंतर रात्री 8 च्या सुमारास ‘श्रीं’चे मंदिराकडे प्रयाण झाले. पंचारती व महानैवेद्यासह ‘श्रीं’चे स्वागत होऊन रात्री 9 वाजता पालखीचे मंदिरात आगमन झाले. सदरेवर विराजमान झाल्यावर ‘श्रीं’ची सर्व देवतांनी केलेल्या स्तोत्रयुक्त पदांचे गायन, सर्व मानकऱयांना पानविडा देऊन ‘श्रीं’ना तोफेची सलामी देऊन पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आल्याचे श्री पूजक सूरज ढोली यांनी सांगितले.

महाराष्ट्र कोरोनामुक्त होऊ दे – पालकमंत्री सतेज पाटील

n राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगली पिके येऊ देत, खऱया अर्थाने जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा सुखी होऊ दे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोरोनामुक्त होऊ दे! अशा शब्दांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबाला आज साकडे घातले. श्री जोतिबाचे दर्शन घेऊन त्यांनी पूजा केली. त्यांच्या हस्ते सातारा जिह्यातील ईनाम पाडळी येथील मानाच्या सासनकाठीचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य व्हावे – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

n दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही श्री जोतिबाचे दर्शन घेतले. महाराष्ट्र हे देशात क्रमांक एकचे राज्य व्हावे, असे साकडे जोतिबा चरणी घातले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, सांगलीच्या मनीषा दुबुले, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, सहसचिव शीतल इंगवले, दीपक म्हेतर यांच्यासह लाखो भाविक उपस्थित होते.

अन्नछत्रचा 2 लाखांवर भाविकांना लाभ

n भाविकांच्या सोयीसाठी डोंगरावर आर. के. मेहता चॅरिटेबल ट्रस्ट व गायमुख येथे सहजसेवा ट्रस्टच्या वतीने मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 2 लाखांवर भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. सहजसेवा ट्रस्टच्या वतीने घेतलेल्या रक्तदान शिबिरात दोनशेहून अधिक भाविकांनी रक्तदान केले

n चैत्री यात्रेच्या मुख्य दिवशी दख्खनचा राजा श्री जोतिबाची आकर्षक राजेशाही थाटातील पूजा बांधण्यात आली होती, तर चैत्र पौर्णिमा व करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या रविवारी होणाऱया रथोत्सवाच्या पूर्वसंध्येला श्री पूजक संजीव वामन मुनिश्वर यांनी साकारलेली देवीची सालंकृत खडी पूजा.