कोल्हापूरात ‘रेमडेसिविर’चे एक इंजेक्शन विकत होते 18 हजारांना , दोघांना अटक

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असतानाच येथेही कोरोना उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे दोघे एक इंजेक्शन तब्बल 18 हजार रुपयांना विक्री करीत होते. त्यांच्याकडून रेमडेसिविरच्या 11 व्हायल्स जप्त करण्यात आल्या आहेत.

योगिराज राजकुमार वाघमारे (वय 24, मूळ रा. समर्थनगर, करूल रोड, मोहोळ, सध्या रा. न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) व पराग विजयकुमार पाटील (वय 26, रा. गणेश कॉलनी, कसबा बावडा, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कोरोनावर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविरचा तुटवडा सध्या जाणवत आहे. राज्यातील इतर जिह्यांसह आता येथेही त्याची टंचाई निर्माण झाली आहे. तरीसुद्धा रेमडेसिविरचा साठा करून काळ्याबाजारात जादा दराने विक्री सुरू असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. न्यू शाहूपुरी येथील सासने ग्राऊंडजवळ असणाऱया एका इमारतीच्या तळमजल्यावर रेमडेसिविरची काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी एक तरुण आल्याची माहिती पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचला होता. यावेळी रेमडेसिविरच्या व्हायल्स काळाबाजाराने विक्रीसाठी घेऊन आलेल्या योगिराज वाघमारे याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडील रेमडेसिविरच्या 3 व्हायल्स हस्तगत करण्यात आल्या. त्याने हे इंजेक्शन कसबा बावडा येथील पराग पाटील याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी याच ठिकाणी काही वेळात रेमडेसिविरच्या व्हायल्स घेऊन आलेल्या पराग पाटील यालाही अटक करून त्याच्याकडील 8 इंजेक्शन हस्तगत केले.

सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, सचिन पाटील, विलास किरोळकर, अमोल कोळेकर, अजय वाडेकर, सागर कांडगावे, अर्जुन बंदरे, संदीप कुंभार, ओंकार परब, अन्न व औषध प्रशासन विभागाकडील औषध निरीक्षक सपना घुणकीकर व मनोज अय्या यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.

आपली प्रतिक्रिया द्या