दोन बहिणींची कौमार्य चाचणी, लग्नानंतर 3 दिवसांत पाठविले माहेरी; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन सख्ख्या बहिणींची कौमार्य चाचणी केल्याची घटना बेळगावात घडली आहे. एकीची चाचणी अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवत लग्नानंतर तीन दिवसांतच दोघींनाही माहेरी पाठवून देण्यात आले. शिवाय जातपंचायतीनेही बेकायदेशीर काडीमोड केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित बहिणींनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन भावांसह चौघांवर राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप सनी कंजारभाट (वय – 25), सुरजित सनी कंजारभाट (वय – 27), शोभा सनी कंजारभट (तिघे रा. हनुमाननगर, बेळगाव) आणि ईश्वर गागडे (रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

राजेंद्रनगर परिसरातील कंजारभाट समाजातील एका कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा विवाह हनुमाननगर (बेळगाव) येथील संदीप व सुरजित या सख्ख्या भावांसोबत 27 नोव्हेंबर 2020 रोजी झाला होता. दरम्यान, लग्नानंतर दोघींचीही कौमार्य चाचणी घेण्यात आली. त्यात एक बहीण अपयशी ठरली. त्यामुळे दोघींच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळींनी त्यांचे शारीरिक मानसिक शोषण करून त्रास देत तीन दिवसांनी घरातून हाकलून माहेरी पाठविले. यानंतर मुलींच्या नातेवाईकांनी नातेसंबंध जुळवून आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यात यश आले नाही.

3 फेब्रुवारी रोजी त्यांना कोल्हापुरातील उजळाईवाडी येथील देवालयात जातपंचायतीसमोर बोलावून बेकायदेशीर काडीमोड करीत दोन्ही पती आणि या पीडितांना समाजातील विवाहेच्छुकांशी विवाह करण्यास मुभा असल्याचाही निर्णय देण्यात आला. या निर्णयाने पीडितांना मानसिक धक्का बसला. त्यामुळे पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेत राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुन्हा सासरी नांदायला यायचे असेल तर घरबांधणीसाठी 10 लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच दागिनेसुद्धा काढून घेण्यात आल्याचा आरोप पीडितांकडून करण्यात आला आहे.