कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याने या घटनेच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ( FAIMA ) देशात ओपीडी सेवा बंद करण्याची हाक दिली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तर मुबंई, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यातील शेकडो डॉक्टर संपावर गेले आहेत. याचा फटका रुग्णांना बसला आहे.
कोलकाता बलात्कार प्रकरणात केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा. आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी निवासी डॉक्टर करत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
फेडरेशन ऑफ ऑल इंडियन मेडिकल असोसिएशनने ( FAIMA ) ओपीडी सेवा देशव्यापी बंद करण्याची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुंबईतील नायर रुग्णालय, जेजे रुग्णालय, केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले आहे. तर नागपुरातील शासकीय मेयो आणि मेडीकल या दोन रुग्णालयाचे डॉक्टर आजपासून संपावर आहेत.
घाटीत डॉक्टरांचा संप
छत्रपती संभाजीनगरात सोमवारी कँडल मार्च काढण्यात आल्यानंतर आज डाॅक्टरांनी संप पुकराला आहे. यावेळी ‘वी वाँट जस्टीस’च्या घोषणांनी रुग्णालय अपघात विभाग दणाणला. कोलकाता येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर निवासी डाॅक्टरांनी संप पुकराला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्वच विभागाचे डॉक्टर संपात सहभागी झाल्याची माहिती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. रोहन गायकवाड यांनी दिली. या घटनेचा निषेध आणि मृत डाॅक्टर तरुणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे इंटर्न आणि निवासी डाॅक्टरांची मार्ड संघटना व असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न (अस्मि) संघटनेतर्फे तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.