कोणार्क विकास आघाडीचा दणका – महापौरांविरोधात राज्यपालांचे कान भरले; भाजप सभागृह नेत्याला पदावरूनच हटवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरी समस्यांचे कारण पुढे करत भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील यांच्याविरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कान भरणारे पालिकेतील भाजप सभागृहनेते शाम अग्रवाल यांची पदावरून हकालपट्टी’ करण्यात आली आहे. भर महासभेत कोणार्क विकास आघाडीने दिलेल्या या दणक्याने भाजप नेत्यांची अब्रू चांगलीच चव्हाट्यावर आली आहे.

दीड वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेतेपदही असेच अचानक काढून घेतल्याने भिवंडी पालिकेत सर्वाधिक नगरसेवक असूनही भाजपची किंमत शून्य आहे हे कोणार्क विकास आघाडीने दाखवून दिले आहे.

भिवंडी पालिकेत भाजपचे 20 तर कोणार्क विकास आघाडीचे अवघे चार नगरसेवक आहेत. असे असताना महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने प्रतिभा पाटील कोणार्कला पाठिंबा दिला. त्यामुळे महापौरपदी प्रतिभा पाटील विराजमान झाल्या. मात्र काही दिवसातच अंतर्गत लाथाळ्यांनी या आघाडीत बिघाडी झाली. यातून दीड वर्षापूर्वी भाजपकडे असलेले विरोधी पक्षनेतेपद महापौरांनी अचानकपणे काढून घेतले. तेव्हापासून उघडपणे दोन्ही पक्षांमध्ये ‘वॉर’ सुरू होते. यातून मार्ग काढण्यासाठी महापौरांनी एक पाऊल पुढे टाकत गेल्या महिन्यात भाजप नेते शाम अग्रवाल यांची सभागृहनेतेपदी निवड केली, पण यानंतरही पालिकेच्या

नियोजनाअभावी कोविडचे शाम अग्रवाल वाढणारे रुग्ण, पाणी समस्या, अनधिकृत बांधकामांचे कारण पुढे करत चार दिवसांपूर्वी अग्रवाल यांनी थेट राजभवन गाठले आणि महापौर प्रतिभा पाटील यांच्याविरोधात भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. याची कुणकुण लागल्याने अस्वस्थ झालेल्या कोणार्क विकास आघाडीने आज झालेल्या महासभेत याचे उट्टे काढत अग्रवाल यांचे पद काढून घेतले.

वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार

कोणार्क विकास आघाडीने एका वर्षात दोन धक्के दिल्याने भाजपचे पालिकेतील नगरसेवक चांगलेच संतप्त झाले आहेत. या अपमानाबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे भिवंडी पालिकेत लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

10 मिनिटांत 10 विषयांना मंजुरी

शुक्रवारी झालेल्या महासभेत अवघ्या 10 मिनिटांत 10 विषयांना मंजुरी देण्यात आली. यात कर्मचाऱ्यांना | सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मंजुरी देण्यात आली.