धावत्या कारमध्ये हाताची नस कापून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड येथील सासुरवाडीत आलेल्या सातारा येथील जावयाने परतीच्या प्रवासादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर धावत्या कारमध्येच हाताची नस कापून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र खेडमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. ही चमत्कारीक घटना मुंबई गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडी नजीक सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथील किशोर बाबर हा तरुण आपल्या खेड तालुक्यात असलेल्या सासरवाडीत आला होता. मात्र तो परतीच्या प्रवासात असताना अचानक त्याला नैराश्याने गाठले आणि त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. विचार पक्का झाल्यावर त्याने आपल्या घरी फोन करून आपण जीवन संपवत असल्याचे सांगितले. घाबरलेल्या त्याच्या नातेवाईकांनी खेड येथे असलेल्या काही ओळखीच्या मित्रमंडळीशी संपर्क साधून किशोर याने अचानक घेतलेल्या निर्णयाची कल्पना देत त्याला वाचविण्याचे साकडे घातले. खेड येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ शोध मोहिम सुरु केली.

किशोरच्या नातेवाईकांनी दिलेला कार आणि मोबाइल क्रमांकावरून त्यांनी त्याला ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याची कार भरणे जाधववाडी येथे अडविण्यात आली. हे सामाजिक कार्यकर्ते जेव्हा कारजवळ पोहचले तेव्हा कारमध्ये रक्ताचे थारोळे जमा झालेले दिसून आले. कार चालक किशोर हा बेशुद्ध असलेला दिसून आला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या खेडच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी क्षणाचाही बिलंब न करता त्याला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनीही त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु केल्याने मृत्युच्या दारापर्यंत पोहचलेल्या किशोरचे प्राण वाचले. सासुरवाडीत आलेल्या किशोर याने परतीच्या प्रवासात इतका टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खेड पोलिसात या घटनेची नोंद झाली असून पोलीस या प्रकरणी
अधिक तपास करत आहेत.