
पावसाळा सुरु झाला की नदीतील अथवा ओढ्यातील वाहत्या पाण्यातून अजगर मानवी वस्तीच्या जवळपास येतात. मानवी वस्ती जवळ आलेले अजगर कोंबड्यांच्या खुराड्यात शिरुन कोंबड्या फस्त करतात. अशीच एक कोंबडी खाणाऱ्या अजगराला तिघांनी जीवंत जाळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. वन विभागाने या निर्दयी तीन व्यक्तीस अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना राजापूर तालुक्यातील नाटे पडवने वाडी येथे घडली.
राजापूर तालुक्यातील नाटे पडवने वाडीतील विजय भिकाजी पारकर (वय 53) यांच्या घराजवळ एक मोठा अजगर आला होता. भुकेलेल्या अजगराने जवळच असलेल्या कोंबड्यांच्या खुराड्यातील एका कोंबडीला भक्ष्य केले. अजगर आपली कोंबडी खात असल्याचे विजय पारकर यांच्या दृष्टीस पडल्यानंतर त्यांनी रागाच्या भरात अजगराला एकाच ठिकाणी रोखून धरण्यासाठी कांबेरु आणले आणि ते जोराने अजगराच्या अंगावर मारले. यामुळे अजगराच्या तोंडातून कोंबडी सुटली खरी मात्र ती तोपर्यंत मृत झाली होती.
कोंबडी मृत झाल्याच्या रागातून विजय भिकाजी पारकर यांनी वंदना विजय पारकर (वय 44), मानसी मंगेश पारकर (27) यांच्या मदतीने अजगराला नारळाच्या झावळ्या गोळा करुन त्यामध्ये जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. अजगर आगीमुळे मृत झाला मात्र पूर्ण जळला नाही. अर्धवट जळलेला अजगर आणि मृत कोंबडी यांना घरामागे असणाऱ्या ओढ्याजवळ नेवून टाकले. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओ करुन तो सर्वत्र व्हायरल केला. नेमकी हीच कृती पारकर कुटूंबीयांच्या अंगलट आली.
अजगराला जाळतानाचा हा व्हिडीओ वन विभागाच्या हाती लागला आणि पारकर कुटूंबातील तिघांवर कारवाईसाठी वन विभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंक लगड, राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक सागर गोसावी, सागर पाताडे , संजय रणधीर यांनी पंचनामा करुन , राजापूरच्या पशुधन अधिकाऱ्यांनी मृत अजगराचे शवविच्छेदन केले. वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत अजगर या प्राण्याचा अनुसूची – 1 मध्ये समावेश होतो. त्यानुसार सदर प्राण्याची शिकार अथवा त्याला मारणे गुन्हा आहे. सदर कायद्यांतर्गत तीन वर्षां पर्यंत कारावासाची शिक्षा, 25 हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. आरोपींनी गुन्हा कबूल केला असून सदर आरोपी वन विभागाने ताब्यात घेतले आहेत. पुढील तपास सुरु आहे. अजगर अथवा तत्सम कोणतेही वन्यप्राणी घराजवळ आल्यास वन विभागाजवळ तातडीने संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अजगराला जिवंत जाळून त्याचा व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल करणं पारकर कुटूंबियांच्या चांगलेच अंगलट आले आहे.





























































