कोकणचो ‘हापूस’च सगळ्यांचो ‘बापूस’! गुजरातच्या ‘वलसाड’ला मानांकन, दिल्यास कोर्टात जाणार

कोकणच्या हापूसला 2018 मध्येच भौगोलिक मानांकन मिळाले असताना आता गुजरातच्या आंब्याला ‘वलसाडचा हापूस’ असे मानांकन देण्याचे संतापजनक कारस्थान सुरू आहे. याला कोकणच्या आंबा बागायतदार-उत्पादकांनी जोरदार विरोध केला आहे. ‘चव आणि दर्जा‘मध्ये कोकणचा ‘हापूस’च सगळय़ांचा ‘बापूस’ असल्याचे सांगत, असा प्रयत्न झाल्यास थेट कोर्टात जाण्याचा इशाराही आंबा बागायतदार-उत्पादकांनी दिला आहे.

कोकणच्या हापूस आंब्याला 2018 साली भौगोलिक मानांकन मिळाले. तर 2016 पासून आफ्रिकेतून हिंदुस्थानच्या बाजारात येणारा मालावी हापूस हासुद्धा 2018 नंतर मालावी मँगो नावाने बाजारात येऊ लागला. मात्र कोकणच्या या हापूसची जादू लक्षात घेता आता गुजरातकडून वलसाड हापूस म्हणून मानांकन मिळवण्याचा डाव सुरू आहे. गुजरात येथील गांधीनगर व नवसारी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून वलसाड हापूसच्या भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

कोकणचा 10 वर्षे लढा

 हापूस आंबा सांगून धारवाडचा किंवा अन्य राज्यातील आंबा विकला जात होता. त्याविरोधात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिह्यांतील आंबा बागायतदार आणि आंबा उत्पादक एकत्र आले.
 2008 मध्ये कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विव्रेते सहकारी संस्था स्थापन केली. दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर 2018 मध्ये हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले.

कोकणचा आंबा म्हणजेच हापूस अशी जगभर ओळख आहे.कोकणच्या हापूसची मधुर चव अन्य कोणत्याही आंब्याला हापूस नाव लावून येणार नाही. वलसाड हापूस मानांकन मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार.
 डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष, आंबा उत्पादक-विक्रेता संघटना

2018 साली आम्हाला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर आम्ही मालावी हापूसच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर तोच आंबा मालावी मँगो नावाने बाजारात येत आहे. वलसाड हापूस मानांकन देण्यास आमचा विरोध आहे.
मुकुंद जोशी, आंबा बागायतदार, रत्नागिरी