कोपरगावात राहत्या घरी गळफास घेऊन अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

949

कोपरगाव शहरा सतरा वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (2) रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. पूजा संजय अरगडे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

सोमवारी आठवडे बाजार असल्याने आई-वडील बाजार करण्यासाठी गावात गेल्याने पूजा ही एकटीच घरी होती. पूजा कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. सोमवारी ती नेहमीप्रमाणे कॉलेज आटोपून घरी आली होती. त्यावेळी तिचे आईवडील घरी नव्हते. बाजार आटोपून आई वडील घरी आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा वाजवला. मात्र, बराच वेळ दरवाजा उघडत नसल्याचे पाहून तिच्या आईवडिलांनी आरडाओरड करून शेजारच्यांना बोलावले. लोक जमा झाल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. आत प्रवेश करताच स्लॅबच्या घरात छताला असलेल्या लोखंडी हुकाला ओढणी अडकवून तिने आत्महत्या केल्याचे दिसले.

याप्रकरणी मयत पूजा हिचे वडील संजय अरगडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पूजाने स्कॉलरशिप ऑनलाइन फॉर्म भरत असताना दोन ऑप्शन चुकले. आता आपल्याला स्कॉलरशिप मिळणार नाही, या निराशेपोटी आत्महत्या केल्याची चिठ्ठी लिहून ठेवली. पूजाचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तिचे शवविच्छेदन केले. त्यानंतर तिचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी मूळगावी राहुरी येथे नेण्यात आला. पूजा हिच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या