मांत्रिक महिलेसह तिघे नाशिकमधून जेरबंद, कोथरूडमधील दांपत्याची फसवणूक प्रकरण

‘महाराज माझ्या अंगात येतात, तुमच्या मुलींचा आजार मी बरा करीन’ असा दावा करून कोथरूडमधील दांपत्याची तब्बल 13 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर काही तासांत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मांत्रिक महिलेसह तिघांना नाशिकमधून अटक केली आहे.

वेदिका कुणाल पंढरपूरकर, कुणाल वैजनाथ पंढरपूरकर, आणि दीपक जनार्दन खडके यांच्यासह वेदिकाची आई आणि भाऊ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 57 वर्षीय अभियंत्याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीची एक मुलगी गतीमंद असून दुसरी दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. 2018 मध्ये त्यांची भजनी मंडळाच्या माध्यमातून दीपक खडके याच्याशी ओळख झाली. खडकेनेच त्यांची ओळख वेदिका पंढरपूरकरशी करून दिली. त्यानंतर वेदिकाने ‘माझ्या अंगात महाराज येतात, तुमच्या मुलींचा आजार मी बरा करू शकते’ असे सांगून दांपत्याचा विश्वास संपादन केला. तिने त्यांच्या वैयक्तिक आणि आर्थिक परिस्थितीची सविस्तर माहिती घेत वेळोवेळी 13 कोटी 20 लाख रुपये उकळले. घरदार, शेतजमीन विकून फिर्यादींनी रक्कम दिली. मात्र, इतकी मोठी रक्कम दिल्यानंतरही मुलींच्या आरोग्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे अखेर फसवणुकीचा संशय आल्याने गुन्हा दाखल झाला आहे.