कंडक्टर तुटल्याने कोयना पायथागृहाच्या स्विचयार्डमध्ये मोठा स्पार्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयना धरणाच्या भिंतीशेजारी असलेल्या पायथा वीजगृहाच्या स्विचयार्डमध्ये सोमवारी रात्री दहाच्या सुमारास 220 केव्हीच्या वनकुसावडे वाहिनीचा कंडक्टर ओव्हरलोडिंगमुळे तुटल्याने स्पार्क होऊन प्रखर प्रकाशझोत बाहेर पडल्याचे कोयनावासीयांनी पाहिले. किमान पाच मिनिटे हा प्रकाशझोत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र, पायथा वीजगृहाच्या स्विचयार्डमध्ये स्पार्क झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

महापारेषण कंपनीच्या पोफळी व वनकुसावडेदरम्यानच्या वीजवाहिनीच्या पायथा वीजगृह स्विचयार्ड येथील ‘बी’ फेजचा कंडक्टर तुटल्याने मोठय़ा प्रमाणात प्रकाशाचे झोत निर्माण झाले आहेत. किमान पाच मिनिटे धरणाच्या दिशेला प्रकाशझोत असल्याने कोयनावासीयांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र, काही वेळाने कंडक्टर तुटल्याने स्पार्क झाल्याची माहिती मिळताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या घटनेमुळे पायथा वीजगृहावर कोणताही परिणाम होणार नाही. रात्र व प्रचंड पाऊस असल्याने दुरुस्ती होऊ शकली नव्हती. मंगळवारी दुपारी एक वाजता दुरुस्ती होऊन प्रवाह सुरळीत झाला.

कोयना धरणात 24 तासांत 5.19 टीएमसी पाणी

कोयना धरणाअंतर्गत विभागात सध्या दमदार पाऊस पडत असल्याने धरणाअंतर्गत विभागातील छोटय़ा नद्या, नाले, ओढे, धबधब्यांतून येणाऱया पाण्यात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. 67 हजार 738 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणातील पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ होत आहे. धरणात सध्या 75.48 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मागील 24 तासांत पाणीसाठय़ात 5.19 टीएमसीने, तर पाणीउंचीत 5.10 फूट वाढ झाली आहे.