‘कुबेर’ माणसं! कुबेर फेसबुक ग्रुपची पाच वर्षांची यशस्वी वाटचाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

फेसबुकसारख्या माध्यमाने जगभरातील लोक सहज जोडले जाऊ शकतात तर त्याचा उपयोग समाजहितासाठी का करू नये, या संकल्पनेला कृतीची जोड देत स्थापन झालेल्या ‘कुबेर फेसबुक ग्रुप’ने पाचव्या वर्षात पदार्पण केले आहे. सध्या या ग्रुपशी 1700 हून अधिक सदस्य जोडले गेले आहेत. वर्धापनदिनाचे औचित्य साधून राज्यभरातील सर्व सदस्य त्या त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत. येत्या 21 जुलै रोजी कोहिनूर हॉल, सिद्धिविनायक मंदिरासमोर, दादर पश्चिम येथे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत विशेष कार्यक्रम होणार आहे.

कुबेर फेसबुक ग्रुपची स्थापना 18 जुलै 2014 रोजी झाली आहे. नगर जिह्यातील संतोष लहामगे यांनी फेसबुकसारख्या आभासी जगातील माणसांना एकत्र आणत या ग्रुपची स्थापना केली. कुबेर फेसबुक ग्रुपचा पाचवा वर्धापनदिन 21 जुलै रोजी मुंबई, पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर आदी ठिकाणी साजरा केला जाणार आहे. दादर येथील कार्यक्रमात प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने, लोकशाहीर नंदेश उमप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय याआधीच्या कुबेर सोहळ्याला प्रमुख पाहुणे असलेले ज्येष्ठ क्रीडा-सिने समीक्षक द्वारकानाथ संझगिरी, ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, ज्येष्ठ संपादक महेश म्हात्रे हे रविवारच्या कार्यक्रमाला आशीर्वाद द्यायला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कुबेर फाऊंडेशनचे संचालक नितीन राणे यांनी दिली.

सामाजिक कार्याची श्रीमंती
कुबेर फाऊंडेशनतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. कुबेर फाऊंडेशनच्या वतीने संगमनेर येथे निवासी शाळा उभारली जाणार आहे. त्यासाठी ग्रुप सदस्यांनी निधी संकलित करून दोन एकर जमीन खरेदी केली आहे. याशिवाय धाराशीव येथील राजुरी या दुष्काळग्रस्त गावात जलसंधारणाचे काम करून तिथला पाणीप्रश्न कायमचा दूर केला आहे. कुबेर हेल्पलाइन, वाचनालय, पब्लिकेशन हाऊस असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. येत्या काळात कुबेर फाऊंडेशनतर्फे कुबेर ब्लड बँक, कुबेर करीयर गायडन्स, मेळावा, लघु आणि गृहउद्योग मेळावा आदी महत्त्वाचे उपक्रम राबवले जाणार आहेत.