मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कुडाळ

मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. राज्य मागास आयोगाचा अहवाल पुढील महिन्यात विधीमंडळाच्या पटलावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सर्व बाजू भक्कम करूया असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढारे यांनी कुडाळ येथे सांगितले. शासकीय निमशासकीय कर्मचा-यांनी ताठ मानेने काम करावे, कोणाच्याही दबावाला घाबरू नये, अन्यायाविरोधात संघटितपणे आवाज उठवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कुडाळ तालुका मराठा समाज कर्मचारी बांधवांचा स्नेहमेळावा रविवारी येथील मराठा समाज हॉल येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्धघाटन अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्य अॅड.सुहास सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कोंढारे बोलत होते. आदींसह तालुक्यातील मराठा बांधव उपस्थित होते.

यावेळी कोंढारे यांनी कर्मचारी, आरक्षण व भारतीय घटना यावर सखोलपणे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. मराठा समाजाला मिळणारे आरक्षण घटनेला धरून नियमात असले पाहिजे. आपण आरक्षणासाठी एकत्रित आलो आहोत तसे याहीपुढे सर्वांनी एकसंघ राहू. तसेच शासकीय सेवेतील कर्मचा-यांचे प्रश्न मोठे आहेत. ते सोडविण्याच्या दृष्टीने संघटितपणे लढा देऊन सोडवून घेणे आवश्यक आहे. काम करताना अन्याय झाल्यास त्याविरोधात संघटितपणे आवाज उठवावा. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागात खुल्या प्रवर्गावर अन्याय होऊ नये यासाठी खुला प्रवर्ग कक्ष असावा अशी मागणी या मेळाव्याच्या निमित्ताने करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सावंत म्हणाले, मराठा समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांबाबत मोर्चे काढले. मोर्चाची दखल घेऊन राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षपदी मराठा व्यक्तीची निवड महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच झाली आहे. प्रत्येकाने ताठ मानेने जगा. शासकीय सेवेत काम करत असताना कोणा अधिका-याने त्रास दिल्यास त्याची फिकीर करू नका. संघटित होऊन जशास तसे उत्तर द्या. त्रास देणा-या अधिका-यांनी 23 ऑक्टोबर 2016 ची रस्त्यावरची साडेचार लाख मराठा बांधवांची परेड लक्षात घ्यावी असा इशाराही त्यांनी दिला. मराठा बांधवांची ग्राहकपेठ तसेच शैक्षणिक प्रशिक्षण शिबीर आयोजनाबाबत त्यांनी यावेळी माहिती देत आपल्या न्याय हक्कासाठी सर्वजण याहीपुढे संघटितपणे लढा देऊया असे आवाहन केले.