इराणचा इस्रायल, अमेरिकेला चकवा! कोणालाच थांगपत्ता लागला नाही अन् गुप्त अण्वस्त्र तळ तयार झाला

इराण-इस्रायल युद्ध संपले असून दोन्ही देशांतील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. इराणमधून गायब झालेल्या 400 किलो समृद्ध युरेनियममुळे आता हा संघर्ष वाढत आहे. इराणने 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी होत आहे. इराणने 60 टक्क्यांपर्यंत युरेनियम समृद्ध केले असून ते 90 टक्के समृद्ध झाले तर ते अण्वस्त्र बनवू शकतात. त्यामुळे जगाचा धोका वाढला आहे. त्यातच आता इराणने इस्रायल आणि अमेरिकेला चकवा देत त्यांना कोणताही थांगपत्ता लागू न देता गुप्त अण्वस्त्र तळ उभारला आहे. त्यामुळे 400 किलो युरेनियमचा मुद्दा जागतिक पातळीवर महत्त्वाचा ठरत आहे.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की इराणने नातानझपासून थोड्या अंतरावर असलेल्या कुह-ए-कोलांग गाझ-ला किंवा पिकॅक्स पर्वताच्या उतारावर चार बोगदे खोदले आहेत. प्रत्येक बोगदा 6 मीटर (20 फूट) रुंद आणि 8 मीटर (26 फूट) उंच आहे. उपग्रह प्रतिमांच्या आधारे तज्ज्ञांनी म्हटले आहे की इराण कदाचित येथे 260 फूट ते 328 फूट खोलीवर अणु संशोधन सुविधा उभारत आहे.

पर्शियन भाषेत कुह म्हणजे पर्वत किंवा टेकडी. कोलांग म्हणजे पिक्के किंवा कुदळ. कुह-ए-कोलांग गझ ला या पर्शियन शब्दाचा अर्थ पिक्के किंवा कुदळसारखा दिसणारा पर्वत असा होतो. इंग्रजीत त्याला पिकॅक्स माउंटन म्हणतात. अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांनंतर, कुह-ए-कोलांग गझ-ला या एकाच शब्दाची खूप चर्चा होत आहे. आता अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की, कुह-ए-कोलांग गाझ-ला हा इराणमधील पर्वताचा तो भाग आहे जिथे अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी इराणने त्यांचे समृद्ध युरेनियम लपवले होते.

द टेलिग्राफमधील एका वृत्तानुसार, जेव्हा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) महासंचालकांनी इराणला पिकॅक्स माउंटनखाली काय चालले आहे असे विचारले तेव्हा इराणचे तुम्हाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही, असे थोडक्यात पण बोचरे उत्तर दिल होते. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने दावा केला होता की त्यांचे समृद्ध युरेनियम सुरक्षित आहे. अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वी, फोर्डो अणुप्रकल्पाबाहेर 16 ट्रकची रांग दिसली होती. इराणच्या अणुकार्यक्रमातील एका तज्ज्ञाने तेव्हा टेलिग्राफला सांगितले होते की अमेरिकेने हल्ला करण्यापूर्वी इराण सरकारने त्यांचे अत्यंत समृद्ध युरेनियम एका गुप्त ठिकाणी हलवले होते. ते गुप्त स्थान कुह-ए-कोलांग गज-ला किंवा पिकाक्से पर्वत असू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.