इंग्लंड दौऱ्यात कुलदीप आमचे ‘हुकमी’ अस्त्र -विराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | मँचेस्टर

मँचेस्टरच्या पहिल्या टी -२० लढतीत यजमान इंग्लंडला ८ गडी राखून सहज पराभूत केल्यावर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या संघ सहकाऱ्यांवर बेहद्द खुश झाला आहे. त्याने ‘चायनामन’ फिरकी गोलंदाज कुलदीप यादववर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.उर्वरित इंग्लंड दौऱ्यात फिरकीवीर कुलदीप यादव आमचे ‘हुकमी’ अस्त्र असेल अशी प्रतिक्रिया विराटने या विजयानंतर दिली.

ओल्डट्रेफोर्डवरील पहिल्या टी -२० लढतीत कुलदीप यादवच्या गुगलीसमोर इंग्लिश फलंदाज पार ढेपाळले. मॅन ऑफ दि मॅच कुलदीपने २४ धावांच्या मोबदल्यात अर्धा इंग्लंड संघ गारद केला. त्यानंतर केएल राहुलने धडाकेबाज फलंदाजीचे दर्शन घडवत ५४ चेंडूंत १०१ धावांची शतकी खेळी केली.त्याच्या या खेळीच्या बळावर टीम इंडियाने इंग्लंडला १० चेंडू आणि ८ विकेट्स राखत पराभवाची धूळ चाखायला लावली. प्रथम फलंदाजीस उतरलेला इंग्लंड संघ सुरुवातीला १ बाद ९४ अशा मजबूत स्थितीत होता. पण कुलदीपचा गुगली भिरभिरला आणि इंग्लंडचे फलंदाज पार गळपटले. कुलदीपने ४ चेंडूंत ३ इंग्लिश फलंदाजांना पव्हेलिअनचा रस्ता दाखवला. कुलदीपच्या फिरकीपुढे यजमानांचा डाव ८ बाद १५९ या धावसंख्येवर आटोपला.त्यानंतर केएल राहुलच्या बॅटचा दांडपट्टा फिरला आणि टी -२० मालिकेत विजयी सलामी देत टीम इंडियाने या फॉरमॅटमधील आपली बादशाहत पुन्हा सिद्ध केली.

कुलदीप कोणत्याही खेळपट्टीवर यश मिळवेल -विराट
मनगटाने चेंडू फिरवणारा कुलदीप कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर यश मिळवू शकेल असा विश्वास व्यक्त करीत विराट पुढे म्हणाला ,कुलदीप इंग्लंडविरुद्धच्या टी -२० आणि वनडे मालिकांत आमचा प्रमुख गोलंदाज असेल.जसप्रीत बुमराहची उणीव त्याने आम्हाला पहिल्या टी -२० सामन्यात मुळीच जाणवू दिली नाही.