अभिप्राय – शेतीमातीतल्या कविता

>> कुंडलिक कदम

युवा कवी आकाश भोरडे लिखित `झालं बाटुकाचं जिणं’ हा अस्सल ग्रामीण शेतीमातीच्या कवितांचा संग्रह नुकताच वाचकांच्या भेटीला आला आहे. आकाश एका शेतकरी कुटुंबातील. त्यामुळे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत काबाडकष्ट करत वडिलांनी कुटुंब चालवले याची प्रचिती या पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचून येते.

`पाठीत मणक्याचा त्रास असतानाही वेळप्रसंगी मफलरने कंबर बांधून रात्रंदिवस काम करणाऱया बापाच्या कष्टाला समर्पित…’ या अर्पणपत्रिकेच्या ओळी वाचताना नकळतपणे डोळ्यांच्या कडा ओलावतात. वडिलांनी किती कष्ट घेतले असतील याची जाणीव होते. आकाश शालेय जीवनापासून कविता करतोय. एक शाळकरी मुलगा कोणती कविता लिहीत होता तर तो लिहीत होता आपल्या शेतकरी बापाचं जगणं, निसर्ग, बाजारभाव, राजकारण, सावकारी या पात अडकलेला शेतकरी, शेतीतला संघर्ष.

`झालं बाटुकाचं जिणं’ हे कवितासंग्रहाचे नावच खूप काही सांगून जाते. बाटुक म्हणजे ज्वारी पेरल्यावर पाऊस न झाल्यामुळे खुरटय़ा स्वरूपात येणारे पीक. दुष्काळ, बाजारभाव, बदलता निसर्ग, व्यवस्था यांच्या पात अडकलेल्या शेतकऱयाचं जगणं या बाटुकासारखं आहे याची जाणीव आकाशची कविता वाचून होते. पुस्तकाचे शीर्षक असणाऱ्या कवितेत कवी म्हणतो की,

बाप कष्ट करी माझा, त्याचं उंच उंच मन
सारा अन्याय सोसून, झालं बाटुकाचं जिणं
तर `बाप माझा शेतकरी’ या कवितेत शेतकरी बापाचं जगणं कसं आहे हे सांगताना कवी म्हणतो,
साऱया जगाचा पोशिंदा
स्वत राहतोय उपाशी
बरसे धो- धो पाऊस, जड होतीया कपाशी

यातून शेती आणि शेतीत राबणारा शेतकरी यांची व्यथा मांडली आहे. ही व्यथा फक्त एका शेतकरी बापाची नाही तर शेतीमातीत राबणाऱया प्रत्येक बापाची ती व्यथा आहे. त्याचप्रमाणे `माझ्या बापाची शाळा’ या कवितेत कवी लिहितो,

तमा नसे कष्टाची घाम सदा त्याच्या कपाळा
रोज उन्हात झिजून विठु झालाय सावळा
रूमण्याची करून लेखणी
त्याने मातीचा केलाय फळा
माझ्या बापाची रोज उन्हात भरते शाळा

आकाश शाळेत जात असताना त्याला शेतकरी बाप शेतात कष्ट करताना दिसत होता. बापाची शेतातली शाळा त्याने खूप छान शब्दबद्ध केली आहे. आकाशची कविता जशी शेती माती यांच्यावर भाष्य करते तशी ती नातीगोती, आईवडील, आजी, निसर्ग, समाज, राजकारण यावर देखील भाष्य करते. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, चांगले संगोपन केले, शिक्षण दिले त्यांना विसरू नका. हा मोलाचा संदेश `आईबाप घराची शोभा’ या कवितेमधून दिला आहे.

पाने फुले गळून गेली, वटवृक्ष जीर्ण झाला
पक्षीणीची पिल्ले ही, गेली सोडून घरटय़ाला

माहेर हा मुलीच्या दृष्टीने आपुलकीचा, जिव्हाळ्याचा विषय. पण आज संपत्ती, इस्टेट या गोष्टींमुळे नात्यांमध्ये फूट पडताना दिसत आहे. आईवडील आपल्या मुलीला पोरके झाले आहेत हेच नेमके आकाशने अचूकपणे माहेर या कवितेत मांडले आहे की,

एक दिवस असा येईल,
जेव्हा या दारात मी नसेल
तेव्हा घराच्या सावलीशी,
तुझा जीव तुटताना दिसेल
थकलेल्या या मांडीवर,
क्षणभर डोकं ठेवून जा
उभ्या उभ्या अर्ध्याराती
पोरी माहेराला येऊन जा

शेतकऱयाला गरिबी पाचवीला पुजलेली. त्यात निसर्गाने झोडपून काढलं की सारंच संपल्यासारखं होतं. पावसाळ्यात गळणाऱया घरात मांडणी वरची भांडी खाली ठेवली जातात. याचे वर्णन करताना घर या कवितेत कवी म्हणतो की,

आला पाऊस धावून, भुई पाण्याने झाली ओली
मांडणी वरच्या भांडय़ांची, खाली आरास मांडली
तर याच पुढे कवी लिहीतो की,
थेंब टिपके भांडय़ात,
सुख दुःखाचं गाणं गावे
फाटक्या या जिंदगीला,
सांगा कसं शेकरावे

अशा दर्जेदार, अस्सल मातीतुन उगवलेल्या, जगण्याला उभारी देणाऱया कविता संग्रहात असुन पाठय़पुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे यांची अभ्यासपुर्ण प्रस्तावना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांची पाठराखण आहे. पुणे येथील परिस पब्लिकेशन यांनी पुस्तकाची सुबक आणि आकर्षक बांधणी केली असून चित्रकार अरविंद शेलार यांनी विषयाला साजेसे मुखपृष्ठ साकारले आहे. अशा दर्जेदार ग्रामीण शेतीमातीचा `झालं बाटुकाचं जिणं’ हा कवितासंग्रह प्रत्येकाने एकदा वाचायलाच हवा.

झालं बाटुकाचं जिणं
कवी : आकाश भोरडे
प्रकाशक : परिस पब्लिकेशन, पुणे.
पृष्ठे : 112 ह किंमत : 180 रु.