कुर्ला येथे भरधाव डबल डेकरचे चाक निखळले, सुदैवाने कोणतीही हानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुर्ला डेपोच्या मार्ग क्र.332 या डबल डेकर बसचे पुढील चाक छोटय़ा खड्डय़ात अडकून निखळल्याचा विचित्र अपघात कुर्ला येथील लोकमान्य टिळक उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडला. या अपघातात सुदैवाने कोणलाही दुखापत झाली नसून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश बेस्ट प्रशासनाने दिले आहेत.

कुर्ला डेपोची बस मार्ग क्र.332 ची डबल डेकर बस सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड उड्डाणपुलावरून जात असताना एका छोटय़ा खड्डय़ात अडकून बसच्या समोरचे चाकच निखळून बाहेर आले. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा विचित्र प्रकार घडला, यावेळी डबलडेकर बस संपूर्ण भरलेली असल्याने तातडीने बस रिकामी करण्यात आली.

सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. ही बस कुर्ला पश्चिम ते अंधेरी पूर्वेला जाते. या प्रकरणी ड्रायव्हरचे स्टेटमेंट घेतले असून त्याने रस्त्यावरील खड्डय़ात रूतून चाक निखळल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.